COPD Disorder | सीओपीडी : नियंत्रणात राहू शकतो! 
आरोग्य

COPD Disorder | सीओपीडी : नियंत्रणात राहू शकतो!

पुढारी वृत्तसेवा

डॉ.अनिल मडके

नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार हा जागतिक सीओपीडी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यावर्षी दि.१८ नोव्हेंबर रोजी हा दिवस जगभर साजरा केला गेला. 'लवकर निदान त्वरित उपचार म्हणजे निरामय जीवन' हे यावर्षीचे घोषवाक्य आहे.

एखादा जिना चढल्यानंतर किंवा थोडे अंतर चालल्यानंतर जर तुम्हाला दम लागत असेल, धाप लागत असेल आणि कुणी तुम्हाला 'हे वय वाढल्यामुळे होणारच' असे म्हणत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. छातीत घरघर किंवा सुंई सुंई आवाज होत असेल तर तो दमा असण्याची शक्यता असते, हे आपल्याला ठाऊक असते. पण तसे काही होत नसेल तर मग काय? मग त्याचे उत्तर सीओपीडी असे असू शकते. सी.ओ.पी.डी. म्हणजे 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज' म्हणजेच फुफ्फुसाचा दीर्घकालीन चिवट विकार.

सीओपीडी ही सार्वजनिक आरोग्याची एक मोठी समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, २०२३ मध्ये जगभरात सीओपीडीमुळे ३४ लाख मृत्यू झाले. मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये याचा तिसरा क्रमांक होता. तर भारतातील मृत्यूंच्या कारणांमध्ये सीओपीडीचा दुसरा क्रमांक होता.

सीओपीडी हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन चिवट विकार असून, यात छोट्या श्वासनलिका आणि वायुकोष यांना हानी पोहोचते. त्यामुळे रुग्णांना फुफ्फुसांतून हवा बाहेर सोडणे सतत कठीण होत जाते. श्वासनलिकांना दीर्घकाळ सूज किंवा दाह निर्माण होऊन खोकला आणि कफ होतो. वायुकोशांच्या भिंती खराब होऊन वायुकोश एकमेकांमध्ये मिसळतात आणि ऑक्सिजन रक्तात मिसळण्याच्या क्रियेमध्ये बाधा येते. सीओपीडी आणि दमा हे वेगवेगळे आजार आहेत; मात्र एखाद्या व्यक्तीला दोन्ही असू शकतात. सीओपीडी हा संसर्गजन्य आजार नाही. एकत्र जेवल्याने, शेजारी बसल्याने किंवा रुग्णाची काळजी घेतल्याने तो पसरत नाही.

सीओपीडीचा धोका कुणाला?

सिगारेट, बिडी आणि धूम्रपानाचे इतर प्रकार किंवा इतरांनी केलेल्या धूम्रपानाचा धूर श्वासातून शरीरात गेल्याने सीओपीडीचा धोका उद्भवतो. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना जळणाच्या लाकडाचा, शेणाच्या गोवऱ्यांचा किंवा कोळशाचा धूर सतत नाकात गेल्याने सीओपीडी होतो. वाहने, उद्योगधंदे, बांधकाम, खाणकाम, शेती आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारा धूळ, धूर, रसायने यामुळे सीओपीडी होतो.

फुफ्फुसांचे आरोग्य जन्मापूर्वीच आकाराला येत असते. अपूर्ण कालावधीत म्हणजे नऊ महिन्यांपूर्वी जन्म, गर्भाशयात किंवा बालपणात पुरेशी वाढ न होणे, बालपणात वारंवार होणारे गंभीर श्वसनसंसर्ग यांमुळे फुफ्फुसांची पूर्ण वाढ होऊ शकत नाही, यांना प्रौढ वयात सीओपीडी होऊ शकतो. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही सीओपीडी होऊ शकतो. दम लागणे, धाप लागणे याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. अनेक जण श्वास लागण्याची चक्क सवय करून घेतात. हळू चालणे, जिने टाळणे, गडबडीने काम न करणे, बाहेरची कामे कमी करणे असे करताना आढळतात. सतत खोकला येत असेल तर तो धुरामुळे, प्रदूषणामुळे, बिडी सिगारेटमुळे येत असेल, असे करून चालढकल केली जाते आणि घरघर म्हणजे दमा असावा असे समजले जाते.

स्पायरोमेट्री म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट नावाची साधी चाचणी यासाठी उपलब्ध असताना ती करण्याकडे टाळाटाळ केली जाते. त्यामुळे सीओपीडीचे निदान व्हायला विलंब होतो. अर्थातच उपचार सुद्धा वेळेवर घेतले जात नाहीत. अनेक रुग्णांच्या बाबतीत सीओपीडी टाळता येतो आणि त्यावर उत्तम रीतीने आधुनिक उपचार करता येतात. फुफ्फुसांचे होणारे नुकसान, लवकर निदान केल्यास कमी होऊ शकते. वेळेवर उपचार घेतल्याने श्वास घेणे सुकर होते आणि जीवन निरामय होते. यासाठी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

सतत खोकला, वारंवार कफ येणे, वाढत जाणारा दम, घरघर, छातीत गच्च झाल्यासारखे किंवा आवळल्यासारखे वाटणे, वारंवार श्वसनाचा त्रास होणे किंवा जंतूसंसर्ग होणे किंवा चालण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्या. विनाकारण थकवा येणे याकडेही लक्ष द्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT