आरोग्य

थंडी आणि न्यूमोनिया; अशी घ्या काळजी

Pudhari News

डॉ. अनिल मडके

वातावरणात थंडी वाढत चालली आहे. वाढत्या थंडीनुसार सर्दीचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना सर्दी, शिंका, नाक गच्च होणे, नाक गळणे, सायनसचा त्रास होणे, घसा खवखवणे आदी तक्रारींचा त्रास होत आहे. 

सी.ए.बी. आणि एन.आर.सी.च्या पार्श्‍वभूमीवर देशभर सामाजिक वातावरण तापलेले असले तरी नैसर्गिकरीत्या मात्र वातावरणात थंडीची तिव्रता वाढत आहे. घरात एखाद्या व्यक्‍तीला हा त्रास सुरू झाला की, एकाची सर्दी एकेक करून सर्वांपर्यंत पसरत जाते, हा अनुभव नवा नाही. थंडीच्या काळात काही व्यक्‍तींच्या वाट्याला येणारा एक गंभीर आजार म्हणजे न्यूमोनिया. न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांतील वायुकोशांना होणारा दाह. आपली श्‍वसनसंस्था नाकापासून सुरू होते आणि त्यात नाक, जाया ग्रसनी, स्वरयंत्र, मोठ्या श्‍वासवाहिन्या, छोट्या श्‍वासवाहिन्या आणि शेवटी वायुकोश अशा वेगवेगळ्या अवयवांचा समावेश श्‍वसनसंस्थेत होते. श्‍वसनसंस्थेच्या वायुकोश या पेशींमधून शरीराला आवश्यक असणारा प्राणवायू रक्‍तामध्ये शोषला जातो आणि पेशींकडून आलेला कार्बन डाय ऑक्साइड वायुकोशामध्ये रक्‍तवाहिन्यांतून सोडला जातो. थोडक्यात, वायुकोश निरोगी असणे हे शरीराला प्राणवायू मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असते. अशा वायुकोशांत दाह होऊन तो दाह वाढत जातो आणि तिथे विशिष्ट प्रकारचा स्राव साचला जातो आणि त्या वायुकोशाचे काही अंशी घनीभवन होते. या प्रक्रियेला न्यूमोनिया असे म्हणतात.

न्यूमोनिया कशामुळे होतो?

आपल्या वातावरणात असणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या जंतूंमुळे न्यूमोनिया होतो. यामध्ये विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्टेरिया), बुरशी (फंगस) आणि विविध प्रकारच्या परजीवी जंतूंचा समावेश होतो. आपले शरीर हे बाहेरच्या सर्व प्रकारच्या जंतूंपासून आपले संरक्षण करत असते. संरक्षण यंत्रणेचे वेगवेगळे प्रकार असतात. जसे की, आपल्या शरीरावर त्वचा असल्यामुळे कोणताही जंतू शरीरात सहज प्रवेश करत नाही. आपल्या नाकावाटे जेव्हा एखादा जंतू- मग तो जिवाणू असो किंवा विषाणू असो- प्रवेश करतो, तेव्हा श्‍वसनसंस्थेत कार्यरत असणार्‍या वेगवेगळ्या यंत्रणा आपले काम चोखपणे करत असतात आणि जसे श्‍वसनसंस्थेत असणार्‍या वेगवेगळ्या पेशी, त्यातून स्रवणारा स्राव, श्‍वासनलिकांच्या आतील बाजूला असणार्‍या केसांसारख्या पेशी आणि त्यांची बाहेरच्या बाजूने होणारी हालचाल या सर्व यंत्रणांच्या अस्तित्वामुळे बाहेरून येणारा जंतू वायुकोशापर्यंत जाऊ दिला जात नाही. म्हणजे, या जंतूंना श्‍वासनलिकेतूनच बाहेर टाकले जाते किंवा रोखले जाते. आपल्याला खोकला येतो तो खोकलासुद्धा आपल्या श्‍वासनलिकांचे आणि श्‍वसनयंत्रणेचे संरक्षण करण्यासाठीच निसर्गाने निर्माण केलेला आहे. यातूनही समजा की जंतू वायुकोशापर्यंत पोहोचू लागला तर श्‍वसनयंत्रणेमध्ये किंवा श्‍वासनलिकेमध्ये शरीरातून वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी रक्‍तातून तेथे येतात आणि त्या जंतूला मारून टाकतात किंवा खाऊन टाकतात. जेव्हा ही संरक्षण यंत्रणा काही कारणांनी दुबळी होते, तेव्हा नाकावाटे आत येणार्‍या जंतूंचे फावते आणि हे जंतू वायुकोशापर्यंत पोहोचतात आणि तेथे दाह निर्माण होऊन न्यूमोनिया होतो.

न्यूमोनिया कोणाला होऊ शकतो?

कोणत्याही कारणाने रोगप्रतिकारक्षमता दुबळी झाली की न्यूमोनिया संभवतो. लहान मुले, अतिवृद्ध व्यक्‍ती, दमा-सीओपीडी-आयएलडी यांसारखे दीर्घकालीन श्‍वसनविकार आहेत अशा व्यक्‍ती, धूम्रपान किंवा मद्यपान करणार्‍या व्यक्‍ती, दीर्घकालीन मूत्रपिंड विकार किंवा दीर्घकालीन यकृत विकार आहे अशा व्यक्‍ती, ज्या व्यक्‍तींना कर्करोग आहे आणि ज्या केमोथेरपी घेत आहेत, अशा व्यक्‍ती यांच्यात रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असते. याशिवाय मधुमेही व्यक्‍ती, हृदयविकार असलेल्या व्यक्‍ती, रक्‍तदाबाचा विकार असलेल्या व्यक्‍ती, विकलांग व्यक्‍ती अशा सर्वांना न्यूमोनिया होऊ शकतो. अर्थात, हे सर्व नसूनही एखाद्या धडधाकट व्यक्‍तीला काही कारणाने काही वेळासाठी दुर्बलता आल्यामुळे न्यूमोनिया होऊ शकतो.

न्यूमोनियाची लक्षणे कोणती?

जेव्हा एखाद्या व्यक्‍तीला सर्दी होते, सायनसचा त्रास होतो किंवा घसा खवखवतो, तेव्हा या तक्रारी संसर्गजन्य असतील आणि अशा तक्रारी जिवाणू-विषाणूंमुळे किंवा एखाद्या जंतूमुळे उद्भवल्या असतील तर हा जंतुसंसर्ग श्‍वासनलिकांमार्फत फुफ्फुसांपर्यंत-वायुकोशापर्यंत पोहोचू शकतो आणि त्या व्यक्‍तीला न्यूमोनिया होऊ शकतो. म्हणून अशा व्यक्‍तींनी सर्दी झाल्यावर, घसा खवखवत असताना डॉक्टरांकडून तातडीने उपचार घेणे, त्यांनी सांगितलेली पथ्ये पाळणे, विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे अशा गोष्टी कराव्यात. त्या नाही केल्या तर मग न्यूमोनिया उद्भवू शकतो. काही व्यक्‍तींना अचानक म्हणजे सर्दी किंवा सायनसचा त्रास नसतानाही न्यूमोनिया उद्भवू शकतो. अशा व्यक्‍तींना दम लागतो, खोकला येतो. खोकल्याबरोबर बडका पडतो. काही व्यक्‍तींमध्ये तो पिवळा असतो, काही व्यक्‍तींमध्ये तो हिरवा असतो. काही व्यक्‍तींचा कफ खाकी रंगाचा किंवा तपकिरी असू शकतो. काही व्यक्‍तींमध्ये खोकल्याबरोबर रक्‍त पडते. याशिवाय छातीमध्ये दुखते. थंडी वाजून ताप येतो. हुडहुडी भरते. या सर्व गोष्टी अचानकपणे म्हणजे अगदी हसत्या बोलत्या व्यक्‍तींमध्येही अशा तक्रारी उद्भवू शकतात. काही व्यक्‍तींमध्ये डोकेदुखी असते. अचानक अशक्‍तपणा येतो. स्नायू दुखणे, अंग दुखणे अशा तक्रारी विशेषतः विषाणुजन्य न्यूमोनियात दिसतात. काही वेळा न्यूमोनियात रुग्णाला गोंधळल्यासारखे होते. हे लक्षण विशेषतः वृद्ध व्यक्‍तींमध्ये दिसते.     (पान 2 वर)(पान 1 वरून) काय काळजी घ्यावी?

न्यूमोनियाची लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने जर त्वरित प्रतिजैविके घेतली तर न्यूमोनिया आटोक्यात येऊ शकतो; परंतु बर्‍याचदा होते काय की, या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. सुरुवातीला आलेला खोकला किंवा छातीत दुखणे यांकडे दुर्लक्ष झाले तर मग न्यूमोनिया वेगाने वाढतो आणि मग जेव्हा धाप प्रचंड वाढते तेव्हा रुग्णालयाकडे धाव घेतली जाते. या बाबतीत जर खूप उशीर झाला असेल तर अशा रुग्णांना प्रसंगी प्राणवायू द्यावा लागतो. काही वेळा व्हेंटिलेटरच्या मदतीने कृत्रिम श्‍वसनाची व्यवस्थाही करावी लागते. कारण, अशा रुग्णांची श्‍वसनयंत्रणा दुर्बल झालेली असते. यालाच 'रेस्पायरेटरी फेल्युअर' असे म्हणतात. 

जर न्यूमोनिया पुढे गेलेला असेल तर बर्‍याचदा हा न्यूमोनिया फुफ्फुसांच्या आवरणात पसरतो आणि फुप्फुसांच्या आवरणामध्ये पू होण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे न्यूमोनियाकडे, त्याच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रक्‍ताच्या चाचण्या करून आणि छातीचा एक्स-रे काढून न्यूमोनियाचे निदान केले जाते. न्यूमोनियाचे प्रमाण जर वाढलेले असेल तर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.

वर नमूद केलेली न्यूमोनियाची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेतल्यास न्यूमोनिया आटोक्यात येतो; परंतु अलीकडच्या काळात एन्फ्ल्युएंझा म्हणजे फ्ल्यूच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंमुळे न्यूमोनिया फार लवकर होत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडच्या काळात न्यूमोनियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. थंडीच्या वातावरणात एक तर काही लोक फारसे बाहेर जात नाहीत. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या आत किंवा ऑफिसच्या कार्यालयाच्या आत जास्त लोक राहिले किंवा एखाद्या ठिकाणी लोक दाटीवाटीने राहिले तर अशा ठिकाणी जंतूंचा प्रसार फार वेगाने होतो.

त्यामुळे थंडीच्या काळात न्यूमोनियाचे प्रमाण वाढलेले आढळते. आपल्याकडे शिंकताना, खोकताना, मोठ्याने बोलताना नाका-तोंडातून तुषार उडतात आणि ज्याच्या तोंडातून ते उडतात त्या व्यक्‍तीला जंतुसंसर्ग असेल तर त्याच्याकडून समोरच्या व्यक्‍तीलाही हा संसर्ग पकडू शकतो. यातील यातील महत्त्वाची बाब अशी की, आपण हाताळत असलेल्या वस्तूंवरही हे तुषार (म्हणजे फोमाईट्स) जातात आणि ती वस्तू दुसर्‍या व्यक्‍तीने हाताळली की तिला न्यूमोनिया होऊ शकतो. म्हणून थंडीच्या कालावधीत गर्दीच्या ठिकाणे शक्यतो टाळावीत; परंतु ते अपरिहार्य असेल तर नाका-तोंडावर रुमाल धरावा.

विशेषतः, खोकताना आणि बोलताना, शिंकताना तर ते अगदी अपरिहार्यच समजावे. यात्रा-जत्रा, स्टँड, बाजार, मंदिराची रांग अशा कोणत्याही ठिकाणी एखाद्या व्यक्‍तीला संसर्ग झाला असेल तर तिच्या खोकण्यातून, शिंकण्यातून किंवा अगदी बोलण्यातूनही थुंकीचे तुषार उडतात. गर्दीतील इतरांनाही संसर्ग होतो. ज्या घरात सर्दीने ग्रस्त असलेली व्यक्‍ती आहे, तिने या गोष्टी पाळाव्यात आणि इतरांनी त्या व्यक्‍तीने हाताळलेल्या वस्तू वापरू नयेत. संसर्गग्रस्त व्यक्‍तीने सर्दी कमी होईपर्यंत वेगळ्या खोलीत झोपावे. थंडीच्या काळात प्रत्येकाने अनेकदा हात स्वच्छ धुवावेत. हात नाकाजवळ वारंवार नेऊ नयेत. हस्तांदोलनासारखे प्रकार शक्यतो टाळावेत. या गोष्टी सांभाळल्या तर याबाबत न्यूमोनियाचा संसर्ग किंवा प्रसार होणार नाही. 

ज्यांना न्यूमोनियाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. स्वतःच्या मताने कोणतीही औषधे-प्रतिजैविके घेऊ नयेत. न्यूमोनिया झाल्याच्या काळात विश्रांती महत्त्वाची असते. भरपूर पेये आणि चांगल्या प्रतीचे अन्‍न घेणे महत्त्वाचे असते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत असेल तर उत्तम प्रकारची प्रतिजैविके शिरेतून द्यावी लागतात, प्राणवायू द्यावा लागतो आणि वर नमूद केल्याप्रमाणे रुग्ण अगदी दुर्बळ झाला असेल तर व्हेंटिलेटरचाही उपयोग करावा लागतो.

थंडीचे दिवस आहेत. सर्वांनीच योग्य ती काळजी घ्यावी आणि न्यूमोनिया टाळावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT