winter hypertension risk | थंडी आणि रक्तदाब 
आरोग्य

winter hypertension risk | थंडी वाढली की रक्तदाबही वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज शिंगाडे

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते. जसजसे बाहेरचे तापमान कमी होते, तसतसे शरीरात बदल सुरू होतात. हात-पाय आखडू लागतात. इतकेच नव्हे, तर शरीरातील रक्ताभिसरणाची गतीदेखील संथ राहते.

थंडीच्या दिवसात जेवणही लवकरच पचते. अधिक प्रमाणात कॅलरी बर्न होतात. त्यामुळे थंडीत वजन वाढत नाही. लक्षात ठेवा, वजनाचा मुद्दा हा सामान्य आहारासाठी लागू आहे. जर आपण हाय कॅलरीचे फूड घेत असाल, तर चरबी कमी करण्यासाठी आपल्याला व्यायाम करणे आवश्यक आहे. तापमानात घसरण झाल्यास शरिरातील वेगवेगळ्या भागात रक्तपुरवठा करणार्‍या नसा स्वत:ला आकुंचित करून शरिराला गरम ठेवण्याचे काम करतात; पण अशा स्थितीत शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत राहत नाही. त्यामुळे हाता-पायाची बोटे कडक होऊ लागतात आणि रक्तदाब वाढू लागतो. रक्तपेशी आखडल्याने मेंदूला रक्तपुरवठा होण्यास अडचणी येऊ लागतात. अशावेळी डोकेदुखीचा त्रासही सहन करावा लागतो.

रक्तपेशी आकुंचन पावल्याने त्याचा परिणाम हृदयावर होतो. हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा धोका बळावतो. थंडीच्या काळात नैराश्य वाढण्याचादेखील धोका असतो. तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे झाल्यास अशा प्रकारच्या नैराश्याला ‘सिजनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर’ असे म्हणतात.

आहार : थंडीच्या काळात आपण आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात मका, ज्वारी, बाजरीचा समावेश करावा. सकस आणि गरम आहार हा हिवाळ्याच्या दुष्परिणामापासून स्वत:चा बचाव करतो. विशेष म्हणजे आहारात अधिक प्रमाणात तूप वापरू नये. तीळ, शेंगदाणा आणि गुळापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. यात लोहसत्त्व चांगल्या प्रमाणात असते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांपासून तयार केलेले सूपदेखील आहारात सामील करावे. या आधारे अनेक पोषक तत्त्वे मिळतात. फळभाज्या, मासे, अंडे याचाही आहारात समावेश करावा. मिरे, इलायची यासारख्या मसाल्याचा वापर करावा.

राहणीमान : थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम, उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो. स्नानानंतर शरीराला खोबर्‍याचे तेल लावावे. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही. हवामान कसेही आणि कोणतेही असो दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. हे शरीरातून विषारी तत्त्व (टॉक्सिंस) बाहेर काढण्यास मदत करते. दररोज सकाळी उन्हात दहा ते वीस मिनिटे बसावे. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

व्यायाम : हृदयाचा त्रास असणार्‍यांना किंवा अन्य आजार असलेल्या मंडळींनी थंडीत सकाळी फिरायला जाण्याचे टाळावे. शक्यतो दररोज सकाळी दहानंतरच फिरणे किंवा वर्कआऊट करणे सोयीचे ठरेल. यामुळे शरीर गरम राहण्यास मदत मिळते. याशिवाय दररोज 30 मिनिटे व्यायाम करावा. त्याची सुरुवात हात, कंबर आणि मानेच्या हालचालीने करावी. मोकळ्या वातावरणात वर्कआऊट करणे टाळावे. एवढेच नाही तर व्यायाम केल्यानंतर लगेचच मोकळ्या हवेत जाऊ नये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT