Clear Vision over 40 | चाळिशीतील चष्मा घालवण्यासाठी... Pudhari File Photo
आरोग्य

Clear Vision over 40 | चाळिशीतील चष्मा घालवण्यासाठी...

वयानुसार डोळ्यांतील नैसर्गिक लेन्स कठीण आणि कमी लवचिक होतात

पुढारी वृत्तसेवा

डॉ. वर्धमान कांकरिया

वयानुसार डोळ्यांतील नैसर्गिक लेन्स कठीण आणि कमी लवचिक होतात. यामुळे जवळच्या वस्तूंवर फोकस करण्याची क्षमता कमी होते. मात्र, आधुनिक नेत्रविज्ञानाने यावर अनेक सुरक्षित व परिणामकारक उपाय शोधले आहेत. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने चाळिशीपुढील व्यक्तींनाही चष्म्याशिवाय स्पष्ट आणि स्वच्छ दृष्टी मिळू शकते.

वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताना अनेकांना एक सामाईक अनुभव येतो, तो म्हणजे‡ वाचन करताना, मोबाईल पाहताना किंवा जवळची कोणतीही वस्तू नीट दिसेनाशी होते. अक्षरे धूसर भासतात, डोळ्यांवर ताण येतो आणि अखेरीस ‘वाचनाचा चष्मा’ हा रोजच्या जीवनाचा भाग बनतो. नेत्रतज्ज्ञांच्या भाषेत या अवस्थेला ‘प्रेसबायोपिया’ असे म्हणतात.

लॅसिक लेसर म्हणजे काय?

डोळ्याची रचना फोटो काढण्याच्या कॅमेर्‍यासारखी असते. त्यात डोळ्याच्या पुढच्या बाजूला असलेल्या भिंगातून प्रकाशकिरण डोळ्यात प्रवेश करतात आणि समोरच्या द़ृष्याची प्रतिमा डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या नेत्रपटलावर (रेटिना) पडते. काही कारणांमुळे ही प्रतिमा नेत्रपटलाच्या थोडी पुढे किंवा मागे पडते आणि ते द़ृश्य आपल्याला अस्पष्ट किंवा धूसर दिसू लागते. समोरच्या द़ृश्याची प्रतिमा पुन्हा बरोबर नेत्रपटलावर पाडण्यासाठी बुब्बुळावर एक शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेला लॅसिक असे म्हणतात.

काय आहे आधुनिक तंत्रज्ञान?

मोनोव्हिजन लॅसिक : या पद्धतीत एका डोळ्याची द़ृष्टी लांबच्या वस्तूंसाठी आणि दुसर्‍या डोळ्याची द़ृष्टी जवळच्या वस्तूंसाठी सुधारली जाते. प्रक्रिया सोपी असली, तरी काहींना दोन्ही डोळ्यांतल्या या समतोलाला जुळवून घेण्यास थोडा वेळ जावा लागतो. पण, बहुतेकांसाठी हा प्रभावी पर्याय ठरतो.

ब्लेंडेड व्हिजन लॅसिक : ही पद्धत मोनोव्हिजनपेक्षा अधिक नैसर्गिक व सुसंगत आहे. यात दोन्ही डोळ्यांची द़ृष्टी विशिष्ट प्रकारे समायोजित केली जाते. यामुळे लांबपासून मध्यम अंतरापर्यंतच्या वस्तू स्पष्ट दिसतात. वाचनासोबतच दैनंदिन कामांमध्ये याचा चांगला उपयोग होतो.

प्रिमियम लेन्स इम्प्लांटस् : ट्रायफोकल, इडीओएफ किंवा अ‍ॅकोमोडेटिव्ह प्रकारच्या लेन्सेसमुळे लांब, मध्यम आणि जवळचे सर्व अंतर स्पष्ट दिसू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया केल्यामुळे भविष्यात मोतीबिंदू होण्याची शक्यता कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT