डॉ. संजय गायकवाड
खोकला हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे जे सहसा काही दिवसांत बरे होते. सर्दी किंवा फ्लूनंतर खोकला बरा व्हायला थोडा जास्त वेळ लागू शकता; परंतु जर खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकला तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
दीर्घकाळ टिकणारा खोकला हा फुप्फुसे, घसा किंवा श्वासनलिकेतील जळजळ, संसर्ग किंवा एखाद्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतो. दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालणार्या खोकल्याला ‘क्रॉनिक कफ’ (जुनाट खोकला) असे म्हणतात. शरीरातील श्वासनलिका किंवा फुप्फुसांतील कफ आणि बाहेरील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी शरीर ही प्रतीक्षिप्त क्रिया करत असते. जेव्हा हा खोकला थांबत नाही, तेव्हा याचा अर्थ श्वासनलिका अजूनही संवेदनशील आहे किंवा फुप्फुसे पूर्णपणे सावरलेली नाहीत. हा खोकला कोरडा किंवा त्यातून कफ पडू शकतो. काही वेळा छातीत जडपणा जाणवणे, धाप लागणे, घरघर होणे किंवा दीर्घ श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणेही दिसतात. हे ‘अस्थमा’ (दमा), ‘क्रॉनिक ब्रॉन्कायटिस’ (जुनाट श्वासनलिका दाह), फुप्फुसाचा संसर्ग किंवा ‘ट्यूबरक्युलोसिस’ (क्षयरोग) यांसारख्या आजारांचे लक्षण असू शकते.
दीर्घकाळ खोकला राहण्याची अनेक कारणे असू शकतात. विषाणूजन्य संसर्गानंतर (पोस्ट-व्हायरल कफ) श्वासनलिकेत काही आठवडे सूज राहू शकते. धूळ, परागकण किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे होणारी अॅलर्जी हे देखील एक मुख्य कारण आहे. ‘अॅसिड रिफ्लक्स’ किंवा ‘जीईआरडी’ मुळे पोटातील आम्ल वर आल्याने घशात जळजळ होऊन खोकला येतो. याव्यतिरिक्त, धूम्रपान, रक्तदाबाची काही औषधे, प्रदूषण आणि रसायनांचा संपर्क यामुळे फुप्फुसांना त्रास होऊन जुनाट खोकला सुरू होतो. विशेषतः दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे हे टीबीचे प्रमुख लक्षण मानले जाते.
तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप राहणे, खोकल्यातून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक वजन कमी होणे, रात्री घाम येणे किंवा छातीत तीव्र वेदना होणे ही चिन्हे फुप्फुसांचा संसर्ग किंवा गंभीर आजार दर्शवतात. डॉक्टर रुग्णाची शारीरिक तपासणी करून, छातीचा ‘एक्स-रे’, फुप्फुसांच्या क्षमतेची चाचणी (पल्मोनरी फंक्शन टेस्ट), रक्ताच्या चाचण्या आणि कफाची तपासणी (स्प्युटम टेस्ट) करून कारणाचे निदान करतात.
उपचारांमध्ये संसर्गासाठी प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स), दम्यासाठी इन्हेलर्स आणि अॅलर्जी किंवा जीईआरडी वरील औषधांचा समावेश होतो. जीवनशैलीत बदल करून धूम्रपान टाळणे, भरपूर पाणी पिणे आणि प्रदूषणापासून दूर राहणे आवश्यक आहे. घरगुती उपायांमध्ये कोमट पाणी पिणे, वाफ घेणे, मध घेणे आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे यामुळे घशाला आराम मिळतो. जर श्वास घेण्यास अडथळा येत असेल, ओठ किंवा चेहरा निळा पडत असेल किंवा खूप जास्त रक्त पडत असेल, तर ती आणीबाणीची स्थिती असून तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचे आहे.