Children Monsoon Injury | मुलांचे पावसाळ्यातील अपघात 
आरोग्य

Children Monsoon Injury | मुलांचे पावसाळ्यातील अपघात

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सुशांत श्रीवास्तव

पावसामुळे ओले झालेले खेळाचे मैदान, निसरडे मजले, जिने, चिखल आणि बऱ्याचदा खड्डे न दिसल्यामुळे होणाऱ्या अपघाताचा धोका वाढतो. धावणे, उड्या मारणे, सायकल चालवणे आणि खेळणे यामुळे पावसाळ्यात मुलांमधील फ्रॅक्चरची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.

साधारणत: प्रौढांच्या तुलनेत मुलांची हाडे अजून वाढीच्या अवस्थेत असतात. त्यांच्या हाडांमध्ये ‘ग्रोथ प्लेट’ (हाडांच्या वाढीसाठी महत्त्वाचा भाग) असल्याने ती अधिक लवचिक असतात. त्यामुळे हाडे सहज तुटत नसली, तरी मुलांमध्ये विशिष्ट प्रकारची फ्रॅक्चर आढळतात. यामध्ये ‘ग्रीनस्टिक फ्रॅक्चर’, ‘बकल (टोरस) फ्रॅक्चर’ आणि ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचा समावेश होतो. विशेषतः ग्रोथ प्लेटला झालेल्या दुखापतींचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार न झाल्यास भविष्यात हाडांच्या वाढीवर आणि त्यांच्या आकारावर परिणाम होऊ शकतो.

पावसाळ्यातील बहुतांश फ्रॅक्चर ही किरकोळ पडल्यामुळे होतात. शाळेतील ओल्या कॉरिडॉरमध्ये धावताना घसरणे, पावसाने ओल्या झालेल्या मैदानावर घसरून पडणे, निसरड्या रस्त्यावर सायकल चालवताना तोल जाणे किंवा जिन्यावरून पडणे ही त्यामागील सामान्य कारणे आहेत. अशा दुखापतींमध्ये मनगट, हाताचा पुढील भाग (फोरआर्म), कोपर, घोटा, पाय आणि कॉलर बोन (हंसलीचे हाड) या भागांना सर्वाधिक इजा होण्याची शक्यता असते.

मुलांमधील फ्रॅक्चरची ही लक्षणे पालकांनी त्वरित ओळखणे गरजेचे आहे. दुखापतीच्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, सूज येणे, स्पर्श केल्यावर दुखणे, तो भाग निळसर पडणे, हात किंवा पायाचा वापर करण्यास टाळणे, चालताना त्रास होणे, हाडाचा आकार बदलल्यासारखे दिसणे किंवा लहान मुले दुखापत झालेल्या भागाला हात लावताच रडू लागणे ही फ्रॅक्चरची महत्त्वाची लक्षणं आहेत.

कोणत्याही फ्रॅक्चरचा संशय आल्यास वेळीच प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचे असते. दुखापत झालेला हात किंवा पाय शक्य तितका स्थिर ठेवावा आणि त्याची अनावश्यक हालचाल टाळावी. सूज आणि वेदना कमी करण्यासाठी कापडात गुंडाळलेला बर्फाचा शेक १५ ते २० मिनिटे देता येतो. मात्र, वाकलेले हाड सरळ करण्याचा प्रयत्न करू नये किंवा दुखापत झालेल्या भागाला मालिश करू नये. अशा वेळी तातडीने बाल अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा जवळच्या आपत्कालीन विभागात मुलाला दाखल करावे.

फ्रॅक्चरचा प्रकार, मुलाचे वय, दुखापतीचे ठिकाण आणि ग्रोथ प्लेटचा सहभाग यानुसार उपचार निश्चित केले जातात. लहान मुलांमध्ये हाडं लवकर भरून येण्याची क्षमता अधिक असल्याने अनेक फ्रॅक्चरवर प्लास्टर किंवा स्प्लिंट लावून यशस्वी उपचार करता येतात. मात्र, हाडांचे विस्थापन झाले असल्यास, सांध्याजवळील किंवा ग्रोथ प्लेटशी संबंधित गंभीर फ्रॅक्चर असल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते.

पावसाळ्यात अशा दुखापती टाळण्यासाठी घरातील पायऱ्या, फरशी कोरडी ठेवावी. बाथरूममध्ये अँटी-स्लीप मॅटचा वापर करावा. जिन्यांमध्ये पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी आणि मुलांना पावसाळ्यासाठी विशेष पादत्राणे घालावेत. शाळा आणि निवासी संकुलांनीही कॉरिडॉर, खेळाची मैदाने आणि जिने कोरडे व सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. मुसळधार पावसात मुलांच्या मैदानी खेळांवर लक्ष ठेवावे आणि निसरड्या ठिकाणी धावणे किंवा असुरक्षित हवामानात सायकल चालवणे टाळण्याचा सल्ला द्यावा. मुलांच्या हाडांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार, पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी, वयानुसार नियमित शारीरिक हालचाली आणि योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश यांचाही मोठा फायदा होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT