डॉ. संजय गायकवाड
अनेकदा बालकर्करोगाचे निदान होण्यासाठी काही महिने जातात आणि काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये वर्षेही निघून जातात. पण या विलंबामुळे कॅन्सरचे ट्यूमर मोठे होत जातात, शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात आणि उपचार अधिक कठीण होतात. विशेषतः किशोरवयीन रुग्णांमध्ये सुरुवातीची लक्षणे सामान्य दुखापत किंवा हालचालींमुळे होणार्या त्रासासारखी दिसत असल्याने ती गांभीर्याने घेतली जात नाहीत.
हाडाच्या कर्करोगांमध्ये ऑस्टिओसार्कोमा हा कॅन्सर अधिक प्रमाणात आढळतो. तो प्रामुख्याने पायांच्या आणि हातांच्या लांब हाडांमध्ये, विशेषतः ग्रोथ प्लेटजवळ निर्माण होतो. जांघेचे हाड (फीमर), पिंडर्याचे हाड (टिबिया) आणि वरच्या बांधाचे हाड (ह्युमरस) येथे तो सर्वाधिक दिसतो.
अद्यापपर्यंत ऑस्टिओसार्कोमा का तयार होतो, याचे ठोस उत्तर सापडलेले नाहीये. पण हा आजार हाडांच्या पेशींमधील डीएनएतील बदलांशी संबंधित आहे. बहुतेकवेळा हे बदल अनियमित स्वरुपाचे असतात. ते अनुवंशिक नसतात. पण ली-फ्रॉमेनी सिंड्रोम किंवा हेरिडिटरी रेटिनोब्लास्टोमा यांसारख्या काही दुर्मीळ आनुवंशिक विकारांमुळे जोखीम वाढते. पूर्वी किरणोत्सर्ग किंवा किमोथेरपी घेतलेल्या मुलांमध्येही पुढील आयुष्यात जोखीम वाढू शकते.
हाडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे
अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार (एसीएस), हाडांच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे अत्यंत साधी असल्यामुळे निदान उशिरा होते.
सतत राहणारी हाडात किंवा सांध्यात वेदना, विशेषतः रात्री वाढणारी
सूज येणे किंवा त्या भागात गाठ जाणवणे
हालचाल करताना वेदना वाढणे
किरकोळ आघातामुळेही हाड मोडणे
हाडे नाजूक होणे
मुलांमधील वेदना विश्रांतीनंतरही कमी होत नसेल, काही आठवडे टिकून राहात असेल किंवा त्यासोबत सूज किंवा हालचालीत अडथळा जाणवत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
निदान कसे केले जाते?
डॉक्टर सर्वप्रथम वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी करतात. दुखापतीसारखी लक्षणे असल्यामुळे निदानासाठी अनेक चाचण्या केल्या जातात.
एक्स-रे : हाडातील असामान्य बदल दिसू शकतात.
रक्त तपासणी : थेट कॅन्सर शोधत नसली, तरी काही मार्कर्स वाढू शकतात.
सीटी स्कॅन : हाडे आणि ऊतींचे तपशीलवार चित्र देतो.
एमआरआय : ट्यूमरचा आकार आणि आसपासच्या ऊतींवरील परिणाम स्पष्ट करतो.
बोन स्कॅन : रेडिओधर्मी ट्रेसरने हाडातील संशयित भाग ओळखता येतो.
निदान झाल्यावर छातीचा सीटी स्कॅन किंवा पीईटी स्कॅनद्वारे कॅन्सर फुफ्फुसांमध्ये किंवा इतरत्र पसरला आहे का, ते पाहतात.
लवकर निदान हेच सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. मुलांना सतत हाडदुखी, अनपेक्षित सूज
किंवा किरकोळ कारणाने फ्रॅक्चर होत असल्यास तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास बरे होण्याची शक्यता मोठी असते.