छातीत जडपणा आणि डाव्या हाताची वेदना सतावतेय? Pudhari File Photo
आरोग्य

छातीत जडपणा आणि डाव्या हाताची वेदना सतावतेय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. बिपीनचंद्र भामरे

प्रौढांमध्ये छातीत जडपणा आणि डाव्या हातात वेदना अशा समस्या मोठ्या संख्येने आढळून येतात; मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे असते. बर्‍याचदा ही लक्षणे हृदयाच्या समस्यांमुळे दिसून येतात. म्हणूनच हृदयाच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देत विलंब न करता त्वरित उपचार करावेत.

बरेच लोक छातीत जडपणा किंवा हाताच्या वेदना, स्नायूंमध्ये ताण येणे यासारख्या किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात किंवा कधीकधी अ‍ॅसिडीटीमुळे छातीत जडपणा जाणवत असल्याचे समजून त्याकडे लक्ष देत नाहीत. दुर्दैवाने ही हृदयविकाराची लक्षणेही असू शकतात आणि उपचारास उशीर करणे धोकादायक ठरू शकते. हृदयाच्या एखाद्या भागात रक्त प्रवाह खंडित झाल्यावर हृदयविकाराचा झटका येतो. शिवाय हृदयविकाराच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये छातीत अस्वस्थता आणि दाब, जडपणा जाणवू शकतो. ही लक्षणे काही मिनिटे टिकून राहू शकतात अथवा थोड्या थोड्या अंतराने अशी लक्षणे आढळून येऊ शकतात.

डाव्या हाताला, खांद्यावर, मानेत, जबड्यात किंवा अगदी पाठीत वेदना आणि अस्वस्थता देखील असू शकते. दम लागणे, मळमळणे, घाम येणे, चक्कर येणे आणि थकवा ही लक्षणे जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. छातीत जडपणा येणे किंवा हात दुखणे किंवा इतर कोणतीही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि लक्षणं समजून घेणे गरजेचे आहे.

लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

बरेच लोक अशा लक्षणांवर मदत घेण्यास उशीर करतात. त्यांना वाटते की, ही गॅस, तणाव किंवा स्नायूंमधील वेदनेची लक्षणं आहेत. परंतु, उपचारास जास्त वेळ लागल्याने हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच छातीत किंवा हातातील कोणत्याही असामान्य वेदना या गांभीर्याने घेणे गरजेचे असते. विशेषतः एखादी व्यक्ती वयोवृद्ध असेल किंवा एखाद्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकाराच्या कौटुंबिक इतिहास असल्यास अशांना याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर एका तासाच्या आत त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेऊन त्यावर त्वरित उपचार करावेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीने स्वतः वाहन चालवू नये. आपत्कालीन सेवेशी संपर्क साधून मदत घ्यावी, अशावेळी घाबरून न जाता शांत आणि स्थिर राहणे गरजेचे आहे. कारण, त्यामुळे हृदयावरील दाब कमी होईल. अशा स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हृदय निरोगी राहण्याकरिता उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह असल्यास नियमित हृदय तपासणी करणे गरजेचे असते. वेळीच उपचाराने एकाद्याचा अमूल्य जीव वाचविता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT