आरोग्य

सर्व्हाइकोजेनिक डोकेदुखी

Arun Patil

डोकेदुखीचे साधारणपणे शंभराहून अधिक प्रकार आहेत. यात काही साधारण डोकेदुखींचा समावेश आहे. डोकेदुखीकडे तात्पुरता आजार म्हणून आपण याकडे पाहतो. परंतु अधिक दुर्लक्ष केल्यास त्याचे स्वरूप गंभीर होऊ शकते. सर्व्हाइकोजेनिक डोकेदुखी म्हणजे डोक्याच्या मागील भागातील दुखणे. त्यावर वेळीच योग्य उपचार करणे गरजेचे असते.

सव्हाईकोजेनिकडोकेदुखीच्या उपचाराबाबत फारशी जनजागृती नसल्याने त्याकडे लक्ष दिले जात नाही. साधारणपणे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणार्‍या लोकांचे मान, पाठ दुखण्याचे प्रमाण अधिक असते. मायग्रेनही या मंडळींच्यात अधिक आढळतो. यामागे दीर्घकाळ संगणकावर काम करणे, हे सर्वात प्रमुख कारण मानले जाते. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल स्क्रिनचा वापर वाढल्याने डोकेदुखीच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. सर्व्हाइकोजेनिक डोकेदुखी हा आजार सर्व्हाइकल स्पाईन म्हणजे मानेपासून सुरू होतो. वास्तविक, हे दुखणे मानेचे आहे. परंतु त्याचा त्रास डोक्याला आणि चेहर्‍याला होतो. यामध्ये जॉईंट्स, डिस्क, मानेचा मांसल भाग आणि तेथील शीर याठिकाणी दुखणे बळावते. मानेच्या वर जोडलेले हाड हे वरील भागाच्या नर्व्ह डिसॉर्डरशी जोडलेले असते. हेच आजाराचे मूळ कारण होय. लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या डोकेदुखीत साधारणत: डोकेदुखीच्या गोळ्या काम करत नाहीत.

या प्रकारचा आजार महिलांमध्ये अधिक दिसतो. डोके वाकवून बराच वेळ काम करावे लागत असेल, तर अशा प्रकारचा आजाराचा त्रास आणखी वाढतो. हेअर स्टायलिस्ट, ट्रकचालक आदींना या आजाराचा धोका अधिक असतो. या मंडळींना दीर्घकाळ तीव्रतेने डोकेदुखीचा सामना करावा लागतो आणि मानही त्रास देत राहते. यात डोक्याचा एक भाग सामील असल्याने त्याची तीव्रता अधिक राहते. मान हलवल्यावर त्रास वाढतो. तर आराम मिळाल्यानंतर मानदुखी, डोकेदुखी कमी राहते. अनेकदा डोळ्यांच्या आसपासही दुखू लागते. अनेकदा हात, खांद्यांना आणि हनुवटीतही वेदना होतात.

उपचार

या आजाराची लक्षणे हे अन्य प्रकारच्या डोकेदुखीप्रमाणेच असल्याने उपचार करणे कठीण जाते. वाढते ताणतणाव, कार्यालयातील वातावरण, असंतुलित आहार आणि अपुरी झोप यामुळे या आजाराची जोखीम वाढत जाते. एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या मदतीने आजाराची तीव्रता जाणून घेता येते. योग्य उपचारासाठी चाचणी आणि तपासणीबरोबरच प्रसंगी इंजेक्शनची देखील गरज भासते.

जीवनशैलीतील बदल, फिजिकल थेरेपी, मेडिटेशन, वेदनाशामक औषधे आणि इंजेक्शन आणि काही प्रकरणांत ऑपरेशन करून या डोकेदुखीवर उपचार केले जातात. दीर्घकालीन उपाय आणि प्रतिबंधासाठी चुकीच्या सवयी बदलणे गरजेचे आहे. म्हणजेच झोपण्याची स्थिती चुकीची असणे, कार्यालयात चुकीच्या पद्धतीने बसणे, बराच काळ एकाच ठिकाणी बसून काम करणे, चुकीची जीवनशैली या गोष्टींत बदल करणे गरजेचे आहे.

डॉ. महेश शिंगाडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT