आरोग्य

आला पावसाळा काळजी घे बाळा… | पुढारी

Pudhari News

डॉ. सौ. स्नेहल पाटील

आता पावसाने सगळीकडेच हजेरी लावली आहे. रस्ते, नदी, नाले सगळे तुडुंब भरून गेले आहेत. या वेळचा उन्हाळा खूपच उष्मा देऊन गेला, त्यामुळे आपण सर्वजण पावसाळा आल्यामुळे खूश आहोत. लहान मुलांचा तर पावसाळा हा अगदी आवडता ऋतू. चिखलात खेळणे, डबक्यात साठलेल्या पाण्यात होडी करून सोडणे, पावसात मुद्दाम भिजणे हे तर प्रत्येक लहान मुलाला आवडणारे; पण जेव्हा कोणत्याही ऋतूत बदल होतो तेव्हा त्याच्याबरोबर छोटे-मोठे आजार येतातच आणि पावसाळा म्हटलं की, त्याबरोबर वातावरणात दमटपणा, डास व साथीचे रोग आलेच आणि मग या सार्‍या बदलांमुळे लहान मुलांना आणि सोबतच त्यांच्या पालकांना बर्‍याच आजारांना सामोरे जावे लागते.

काही पावसाळ्यातील सामान्य आजार म्हणजे, व्हायरल इन्फेक्शन (डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, फ्लू), हगवण (कॉलरा), सांधेदुखी, अंगदुखी इतर यातून पूर्णपणे सुटका नाही होऊ शकत; पण तुम्ही पालकांनी या खालील काही सूचना पाळल्या तर तुमच्या मुलांना पावसाळ्यातील आजारांपासून दूर ठेवू शकता. 

1) मुलांना शक्यतो 100 टक्के कॉटनचे कपडे घाला. कपडे अंगभरून असावेत. जेणेकरून डास चावणार नाहीत. पायात बुटाचा वापरच असावा. ज्यामुळे चिखलात, पाण्यात खेळताना मुलाचे पाय घाण होणार नाहीत व पूर्ण अंगभरून कपडे व बूट यामुळे डासांपासून संरक्षण मिळू शकते. 

2) आपल्या मुलाला संतुलित अन्‍न द्या जे 'व्हिटॅमिन सी' आणि प्रोटिनयुक्‍त असे पदार्थ असावेत जे त्यांची रोगप्रतिकारक शक्‍ती वाढवतील. 

3) आपल्या मुलाला नेहमी ताजे, गरम अन्‍न द्या, कोणतेही उघड्यावरचे खाद्यपदार्थ मुलांना देऊ नका, ताजे, गरम व घरी बनवलेले अन्‍न मुलांना द्याल हे सुनिश्‍चित करा.

4) पाणी फक्‍त उकळून थंड केलेले द्या. मूल लहान असेल व त्याला फॉर्म्युला दूध सुरू असेल तर त्याला उकळून थंड केलेल्या पाण्यातून तयार करून द्या. 

5) जर आपण आपल्या बाळाला स्तनपान करत असाल, तर त्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी वरून वेगळं पाणी देण्याची काहीच गरज नाही. त्याच्या गरजेनुसार त्याला फक्‍त स्तनपान द्या.

6) आपल्या मुलांची खोली, अंथरूण स्वच्छ आणि कोरडे ठेवा. 

7) डासांची पैदास टाळण्यासाठी आपले घर, आसपासच्या भागात स्वच्छता ठेवा. पाणी, डबकी साठू देऊ नका. 

8) आपल्या मुलाला पावसात खेळू देऊ नका.

9) लहान बाळ असेल तर त्याला दुपारच्या वेळी जेव्हा थंडी कमी असेल तेव्हा कोमट पाण्यानेच अंघोळ घाला. परंतु, थंड पाणी वापरू नका. कारण, त्याला त्रास होऊ शकतो. आपण त्याच्या अंघोळीच्या पाण्यात अँटिसेप्टिक द्रवपदार्थांचे काही थेंब घालू शकता.

10) लहान मुलांचे पाय नेहमीच कोरडे ठेवा आणि मुलाला पायमोजे घाला. जेणेकरून थंडीपासून संरक्षण  होईल. 

होमिओपॅथिक उपचार ः 

1) पावसात भिजल्यामुळे जर मुलाला ताप आला असेल तर नॅट-सल्फ, कॅल्क, डल्का, फेरम, रस्टॉक्स इ. वापरू शकता.

2) इन्फ्ल्युएंझा हा अचानक ताप, नाक वाहणे, खोकला, डोळे दुखणे, डोकेदुखी आणि शरीराच्या वेदनांसह व्हायरल संक्रमण आहे. इन्फ्ल्युएंझाच्या उपचारांमध्ये बरीच मदत असणार्‍या काही होमिओपॅथिक औषधी म्हणजे-अकोनाईट, जेल्सेनियम आणि युपरेटोरियम आहेत.

3) डेंग्यूच्या तापासाठी सर्वात प्रभावी होमिओपॅथिक उपचार-युपरेटोरियम, पोडोफायटम, जेलिझियम, चायना, इपिकाक इ. आहेत. 

अर्थातच तुमच्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार हे वरील उपचार घेऊ शकाल. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT