Cervical Cancer Pudhari Online
आरोग्य

महिलांनो सावधान! 'या' 5 गोष्टी ठरतात Cervical Cancer चे कारण

Cervical Cancer Causes | जाणून घ्या, काय म्हणतात स्त्रीरोगतज्ज्ञ

shreya kulkarni

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. गर्भाशयाचा खालचा भाग, जो योनीशी जोडलेला असतो, त्यालाच ग्रीवा (cervix) म्हणतात. याठिकाणी जर पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊ लागली आणि ती इतर अवयवांवर पसरू लागली, तर त्याला गर्भाशयाच्या ग्रीवेचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असे म्हणतात. विशेष म्हणजे, या कर्करोगाची सुरुवात खूपच सौम्य असते आणि त्यामुळेच त्याला "सायलेंट किलर" असेही संबोधले जाते, कारण सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत.

(Cervical Cancer Causes)

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे काय?

आजच्या काळात महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ही एक गंभीर आणि वेगाने वाढणारी समस्या ठरत आहे. २०२२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगभरात सुमारे ६,६०,००० नवीन रुग्ण नोंदवले गेले, तर ३,५०,००० महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेळेवर जागरूकता, तपासणी आणि लसीकरण गरजेचे ठरत आहे.

हा कर्करोग गर्भाशयाच्या खालच्या भागात होतो, जो भाग गर्भाशयाला योनीशी जोडतो. या भागातील पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि इतर अवयवांवर आक्रमण करतात.

मुख्य कारणे :

  • एचपीव्ही (HPV) विषाणूचा संसर्ग

  • सुरक्षित लैंगिक संबंधांचा अभाव

  • धूम्रपान

  • लवकर वयात लैंगिक संबंध सुरू होणे

  • दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

महत्वाची लक्षणे :

  • संभोगानंतर रक्तस्राव

  • दुर्गंधीयुक्त पांढरा स्राव

  • कंबर आणि ओटीपोटात सतत वेदना

  • लघवी करताना जळजळ

  • तीव्र थकवा आणि अशक्तपणा

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्याचे उपाय :

  • HPV लसीकरण (वय ९ ते २६)

  • पॅप स्मीअर चाचणी दर ३ वर्षांनी

  • सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे

  • धूम्रपान टाळणे

  • त्या भागांची स्वच्छता राखणे

कर्करोगाचा मुख्य कारण: HPV विषाणू

मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) हा या कर्करोगामागील सर्वात मोठा आणि सामान्य कारणीभूत विषाणू आहे. हा विषाणू लैंगिक संबंधाद्वारे पसरतो. जगातील बहुतांश महिलांना आयुष्यात कधीतरी HPV होतो, परंतु बहुतेक वेळा शरीर त्यावर नियंत्रण मिळवते. मात्र काही प्रकार अतिशय घातक असून, ते गर्भाशयाच्या पेशींमध्ये अनुवंशिक बदल घडवून कर्करोग निर्माण करू शकतात. याशिवाय धूम्रपान, वारंवार लैंगिक भागीदार बदलणे, कमी वयात लैंगिक संबंध, दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, आणि रोगप्रतिकारशक्ती कमजोर असणे यासारखी कारणेही कर्करोगाचा धोका वाढवतात.

कर्करोगाची संकेत देणारी लक्षणे

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हळूहळू वाढणारा आजार असल्याने सुरुवातीला तो कोणतेही स्पष्ट लक्षणे देत नाही. पण रोग वाढल्यावर शरीर काही सिग्नल देऊ लागते. त्यामध्ये संभोगानंतर रक्तस्त्राव होणे, अधिक काळ दुर्गंधीयुक्त किंवा बदललेला पांढरा स्राव, कंबर व ओटीपोटात वेदना, लघवी करताना त्रास, आणि वारंवार लघवी लागणे ही प्रमुख लक्षणे आहेत. याशिवाय, शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे हे देखील एक प्रमुख कारण असू शकते.

गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा प्रतिबंध

या आजाराचा प्रतिबंध करणे शक्य आहे, फक्त त्यासाठी वेळेवर योग्य पावले उचलावी लागतात. HPV लसीकरण हा त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. ९ ते २६ वयोगटातील मुलींना ही लस देणे गरजेचे आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे पॅप स्मीअर चाचणी, जी वयाच्या २१ वर्षांनंतर दर तीन वर्षांनी केली जावी. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या पेशींच्या बदलांचे निदान करता येते आणि वेळेवर उपचार शक्य होतात.

याव्यतिरिक्त, लैंगिक संबंध करताना सुरक्षितता पाळणे, धूम्रपान टाळणे, आरोग्यवर्धक आहार घेणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे हे देखील गरजेचे आहे. महिलांनी आपल्या शरीरातील कोणत्याही बदलांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करणारा गंभीर आजार आहे. मात्र, योग्य माहिती, वेळेवर लसीकरण, आणि नियमित तपासणी यामुळे तो पूर्णपणे टाळता येऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आणि वेळोवेळी आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे.

"गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान अगदी प्राथमिक टप्प्यात शक्य आहे, आणि यासाठी 'पॅप स्मीअर' आणि 'एचपीव्ही डीएनए चाचणी' या तपासण्या अत्यंत प्रभावी ठरतात. माझ्या वैद्यकीय अनुभवावरून सांगायचं झालं, तर वेळेवर निदान झालेल्या रुग्णांमध्ये उपचार यशस्वी होण्याची शक्यता 90 टक्क्यांहून अधिक असते, आणि त्यांना निरोगी आयुष्य परत मिळू शकतं. म्हणूनच, स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मी सर्व महिलांना हा सल्ला देते की त्यांनी नियमित तपासण्या करून घ्याव्यात आणि किशोरवयातच एचपीव्ही लसीकरण करावं.
तसेच, महाविद्यालयांमध्ये किशोरवयीन मुलींना एचपीव्ही विषाणू, लसीकरण व सुरक्षित लैंगिक शिक्षण याबाबत योग्य वैज्ञानिक माहिती देणं हे त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय, अनेक ग्रामीण महिलांमध्ये एक गैरसमज प्रचलित आहे की सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन्स किंवा मेंस्ट्रुअल कप्स यांच्या वापरामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हेतो. मात्र, वैद्यकीय दृष्टिकोनातून याला कोणताही आधार नाही. हा आजार फक्त एचपीव्ही विषाणूमुळे होतो, त्यामुळे अशा चुकीच्या समजुतींपासून दूर राहणं गरजेचं आहे.
आजच्या काळात लहान वयात लैंगिक संबंध प्रस्थापित होणे, वारंवार पार्टनर बदलणं या गोष्टी लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना व युवतींना लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि वैज्ञानिक शिक्षण असणे अत्यावश्यक आहे. तसेच, जे व्यक्ती या गोष्टींशी संबंधित आहेत, त्यांनी दर पाच वर्षांनी कमीत कमी एकदा आरोग्य तपासणी करून घ्यावी, ही काळाची गरज आहे.
- डॉ. सुलभा कुलकर्णी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ | लॅप्रोस्कोपी व अल्ट्रासाऊंड तज्ज्ञ | कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT