कर्करोगाशी झुंज देणं हे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक द़ृष्टिकोनातून अत्यंत कठीण असतं; मात्र योग्य उपचारानंतर जेव्हा रुग्ण कर्करोगातून पूर्णपणे बरा होतो, तेव्हादेखील त्याने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
कर्करोगातून मुक्ती मिळाल्यानंतरही शरीरात पुन्हा हा दुर्धर आजार होण्याची शक्यता काही प्रमाणात कायम राहते. म्हणूनच उपचारानंतरच्या काळात जीवनशैलीत योग्य बदल करणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार पावले उचलणे गरजेचे असते.
1) कर्करोगातून बरे झाल्यानंतरदेखील रुग्णांनी ठरावीक काळानंतर डॉक्टरांकडे नियमित फॉलोअप करणे आवश्यक आहे. या तपासण्यांमध्ये रक्त तपासणी, स्कॅन किंवा इतर चाचण्या केल्या जातात. यामुळे शरीरात पुन्हा कुठे कर्करोग वाढत असेल, तर त्याचा वेळीच शोध घेता येतो आणि लगेच उपचार सुरू करता येतात.
2) कर्करोग होण्यामागे अनेक वेळा चुकीची जीवनशैलीदेखील कारणीभूत असते. म्हणूनच उपचारांनंतर आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. संतुलित आणि पोषणमूल्य असलेला आहार घ्या. प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड टाळा. साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. रोज किमान 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. झोपेचा अभावही शरीरातील पेशींमध्ये असंतुलन निर्माण करतो. दररोज कमीत कमी 2-3 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. दररोज 30 मिनिटे चालणे, योग आणि प्राणायाम यासारखे व्यायाम नियमितपणे करा.
कर्करोगाशी झालेली लढाई केवळ शारीरिक नसते, तर मानसिकदेखील असते. उपचारांनंतर अनेक रुग्णांमध्ये नैराश्य, भीती, चिंता अशा भावना उत्पन्न होतात. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्या. ध्यानधारणा, मेडिटेशन नियमितपणे करा.
काही प्रकरणांमध्ये उपचारानंतर काही वर्षांनी पुन्हा कर्करोग होऊ शकतो. याला रि-करन्स असे म्हणतात. कधी कधी कर्करोग जुन्या जागीच परत येतो, तर काही वेळा शरीरातील इतर भागांमध्येही निर्माण होतो. त्यामुळे आरोग्य तपासण्यांबाबत हलगर्जीपणा करू नका.
कर्करोगातून बरे होणे म्हणजे लढाई जिंकल्याची नांदी असते. मात्र, त्यानंतरची काळजी ही पुढील टप्प्यांची तयारी असते. योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन आणि नियमित तपासण्या यांच्याद्वारे आपण कर्करोगाचा धोका कमी करू शकतो. म्हणूनच, उपचारानंतरही आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.