Wisdom Teeth Ear Pain | अक्कल दाढेमुळे कानदुखी निर्माण होऊ शकते? Pudhari File Photo
आरोग्य

Wisdom Teeth Ear Pain | अक्कल दाढेमुळे कानदुखी निर्माण होऊ शकते?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज कुंभार

कानाजवळ बोथट दुखणे जाणवते, जबड्यात ठणकणारी वेदना पसरते; पण कानात संसर्गाचे कोणतेही ठोस लक्षण आढळत नाही, तरीही दुखणे कमी होत नाही. अशा वेळी अनेकदा कारण कानाशी संबंधित नसते, तर दातांशी, विशेषतः अक्कल दाढांशी संबंधित असू शकते.

‘अक्कल दाढ कानदुखी निर्माण करू शकते का’, असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो; पण त्याचे उत्तर आश्चर्यकारकपणे होकारार्थी आहे. विशेषतः या दाढा अर्धवट उगवलेल्या असतील किंवा संसर्गग्रस्त असतील, तर कानात वेदना जाणवू शकतात. ही वेदना बहुतेकवेळा थेट कानातील समस्या नसून ‘रेफर्ड पेन’ स्वरूपाची असते, म्हणजेच वेदनेचे मूळ एका ठिकाणी असते; पण ती दुसर्‍या ठिकाणी जाणवते. दात, जबडा, कान, मज्जासंस्था आणि सायनस यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध असल्याने असे घडते.

कान आणि अक्कल दाढ यांच्यामध्ये समान किंवा जवळजवळ समान मज्जामार्ग असतात. चेहरा आणि डोक्यातून जाणार्‍या या मज्जासंस्थांवर अर्धवट उगवलेल्या किंवा संसर्ग झालेल्या अक्कल दाढांमुळे ताण येतो. हा ताण मज्जासंस्थेला चिडचिडा बनवतो आणि त्यातून कानात वेदना जाणवू लागतात, जरी प्रत्यक्षात कान निरोगी असला तरीही अक्कल दाढ पूर्णपणे उगवली नाही, तर दात आणि हिरड्यांच्यामध्ये पोकळी निर्माण होते. या पोकळीत अन्नकण अडकतात आणि जीवाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. त्यातून संसर्ग निर्माण होतो. हा संसर्ग आणि त्यामुळे होणारी सूज आजूबाजूच्या भागात पसरू शकते. जबड्याच्या मागील भागात, गालात आणि कानाजवळ ही सूज वेदना निर्माण करते आणि कानदुखी असल्याचा भास निर्माण होतो.

याशिवाय अक्कल दाढ जबड्याच्या सांध्यावरही परिणाम करू शकतात. टेम्परोमॅन्डिब्युलर जॉईंट म्हणजेच जबडा आणि कवटी यांना जोडणारा सांधा हा कानाच्या अगदी जवळ असतो. अर्धवट उगवलेल्या अक्कल दाढांमुळे या सांध्यावर अतिरिक्त दाब येतो. या सांध्याला सूज आली की, त्याचा परिणाम कानात वेदना, दडपण किंवा कधी कधी कर्णबधिरतेसारखी जाणीव निर्माण होण्यात होतो. वरच्या जबड्यातील अक्कल दाढ काहीवेळा सायनसच्या पोकळ्यांजवळ असतात. या दाढांमुळे सायनसवर दाब पडला, तर सायनसमध्ये दडपण, जडपणा आणि वेदना जाणवतात. या वेदना अनेकदा कानात दुखत असल्यासारख्या भासतात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो.

कानदुखी अनेक कारणांनी होऊ शकते, त्यामुळे ती अक्कल दाढांमुळेच आहे, हे ओळखणे महत्त्वाचे ठरते. जबड्यापासून कानापर्यंत पसरलेली वेदना, विशेषतः एका बाजूला अधिक जाणवणे, हिरड्यांच्या मागील भागात सूज किंवा कोमलता, तोंड पूर्णपणे उघडण्यास अडचण, चावताना त्रास, तोंडात वाईट चव येणे, घसा दुखणे किंवा जबडा कडक झाल्यासारखा वाटणे, तसेच कानात तपासणी केल्यानंतरही संसर्गाचे ठोस लक्षण न दिसणे, ही सर्व चिन्हे अक्कल दाढांकडे निर्देश करतात. दंत तज्ज्ञांकडून तपासणी आणि एक्स-रे केल्यास याचे नेमके कारण स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT