डॉ. महेश बरामदे
रक्तदाब म्हणजे हृदयाकडून रक्तवाहिन्यांमध्ये प्रवाहित होणार्या रक्तामुळे त्यांच्या भिंतींवर पडणारा दाब. सामान्यतः रक्तदाब ९०/६० मि.मी. पार्यापेक्षा कमी असल्यास त्याला कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शन म्हटले जाते. मात्र, काही व्यक्तींमध्ये नैसर्गिकरीत्या रक्तदाब कमी असतो आणि त्यांना कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे केवळ रक्तदाबाच्या आकड्यांवरून आजाराचे निदान करता येत नाही. रक्तदाब अचानक किती कमी झाला आणि त्यासोबत कोणती लक्षणे दिसत आहेत, हे अधिक महत्त्वाचे असते.
केवळ रक्तदाब कमी झाल्यामुळे हातापायांमध्ये बधिरपणा निर्माण होणे हे सामान्य लक्षण नाही. अशा तक्रारींमागे इतर वैद्यकीय कारणांचा शोध घेणे आवश्यक असते.
रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात काय घडते?
रक्तदाब अचानक घसरल्यास मेंदू आणि शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा अपुरा पडू शकतो. परिणामी, चक्कर येणे, डोके हलके वाटणे, अशक्तपणा, धूसर दिसणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसतात. रक्तदाब अत्यंत कमी झाल्यास गोंधळल्यासारखे होणे आणि अवयवांच्या कार्यावर परिणाम होणे शक्य असते. त्यामुळे तीव्र रक्तदाबघट ही वैद्यकीय आणीबाणी ठरू शकते.
हातापायांना मुंग्या येण्यामागील कारणे
हातापायांमध्ये संवेदना निर्माण होणे आणि त्या मेंदूपर्यंत पोहोचविण्याचे काम मज्जातंतू करतात. या मज्जातंतूंवर दाब पडल्यास किंवा त्यांचे कार्य बिघडल्यास मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जळजळ जाणवू शकते.
मधुमेहामुळे होणारी पेरिफेरल न्यूरोपॅथी, जीवनसत्त्व बी-१२ ची कमतरता, थायरॉईडचे विकार आणि मज्जातंतूंवरील दाब ही त्यामागील काही प्रमुख कारणे आहेत. काही वेळा रक्तक्षय किंवा इतर आजारांशी संबंधित लक्षणेही सोबत दिसू शकतात. त्यामुळे वारंवार मुंग्या येत असल्यास त्यांचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे.
कमी रक्तदाब आणि बधिरपणा यांचा संबंध
रक्तदाब अचानक कमी झाल्यावर काही व्यक्तींना चक्कर किंवा बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत मुंग्या आल्यासारखे जाणवू शकते. मात्र, एखादा हात, पाय किंवा शरीराचा विशिष्ट भाग सतत बधिर राहत असेल, तर त्याचे कारण केवळ रक्तदाब कमी होणे आहे असे मानणे चुकीचे ठरू शकते. विशेषतः बधिरपणासोबत स्नायूंची शक्ती कमी होत असल्यास तातडीने तपासणी करावी.
वारंवार मुंग्या येत असल्यास काय करावे?
अशा रुग्णांमध्ये डॉक्टर रक्तदाब, मधुमेह, नियमित घेतली जाणारी औषधे आणि पूर्वीच्या आजारांची माहिती तपासतात. आवश्यकतेनुसार रक्तातील साखर, जीवनसत्त्व बी-१२, थायरॉईडचे कार्य आणि मज्जातंतूंच्या तपासण्या केल्या जाऊ शकतात. हातापायांना मुंग्या येणे हे कमी रक्तदाबाचे निश्चित लक्षण नाही. त्यामुळे
प्रत्येक वेळी त्याचा संबंध रक्तदाबाशी जोडून दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. लक्षणांचे स्वरूप, तीव्रता आणि कालावधी लक्षात घेऊन वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे हाच सुरक्षित मार्ग आहे.