डॉ. महेश शिंगाडे
कॅक्टस वॉटरचा मूत्रल (डाययुरेटिक) प्रभाव लघवीची मात्रा वाढवतो. सबब रक्तदाबासाठी औषधे घेणार्यांनी किंवा किडनीशी संबंधित काही आजार असणार्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे पेय प्यावे किंवा ते वर्ज्य करावे. कॅक्टस वॉटर हा काही नियमित पाण्याला पर्याय नाहीये. त्याकडे केवळ पूरक पर्याय म्हणून पाहावे.
हल्ली सोशल मीडियावरून प्रसारित होणारे आरोग्यसल्ले हे उपयुक्त कमी आणि संभ्रम निर्माण करणारे, माणसांना विचलित करणारे अधिक ठरताहेत. विशेष म्हणजे लोकांचा वैद्यकीय तज्ज्ञांपेक्षाही या बातम्यांवर असणारा विश्वास चिंता वाढवणारा आहे. या विश्वासाचा फायदा घेत अनेक नवनवीन उत्पादनांचा प्रचार-प्रसारही विपणन क्लृप्त्यांद्वारे केला जातो. त्यातूनच दर काही दिवसांनी सोशल मीडियावर नवा ट्रेंड दिसून येतो. मध्यंतरी अल्कली वॉटरची जशी चर्चा होती तशाच प्रकारे कॅक्टस वॉटर हाही ट्रेंड आरोग्यदायी म्हणून सोशल मीडियावर झपाट्याने लोकप्रिय होतो आहे. अनेक इन्फ्लुएन्सर्स याचा प्रचार ‘हायड्रेशनसाठी उत्तम पर्याय’ म्हणून करत आहेत; परंतु खरंच हे पेय शरीरासाठी फायदेशीर आहे का, याचा सखोल विचार करणे आवश्यक आहे.
कॅक्टस वॉटर हे प्रिकली पिअर नावाच्या काटेरी झाडाच्या फळांपासून तयार होते. हे फळ गुलाबी रंगाचे असून, त्याचा रस किंचित आंबटसर व गोडसर चव असलेला असतो. काही ब्रँडस् हे पाणी फिल्टर केलेल्या पाण्यासोबत मिसळून देतात, त्यामुळे याची चव अधिक सौम्य व गोडसर लागते. कॅक्टस वॉटरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असल्याने ते शरीरातील पाण्याचे संतुलन राखतात, स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवतात आणि हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. याचबरोबर यात बेटालेन्स नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह, कर्करोग व मेंदूशी संबंधित आजारांचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
यातील काही गोष्टींमध्ये तथ्य असले तरी त्याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे, तसेच कॅक्टस वॉटरचा मूत्रल (डाययुरेटिक) प्रभाव लघवीची मात्रा वाढवतो. सबब रक्तदाबासाठी औषधे घेणार्यांनी किंवा किडनीशी संबंधित काही आजार असणार्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे पेय प्यावे किंवा ते वर्ज्य करावे. तसेच कॅक्टस वॉटर हा काही नियमित पाण्याला पर्याय नाहीये. त्याकडे केवळ पूरक पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. बाजारात उपलब्ध असलेल्या काही कॅक्टस वॉटर ब्रँड्समध्ये कृत्रिम गोडवा, कृत्रिम रंग आणि चव वाढवण्यासाठी रसायनयुक्त घटक मिसळलेले असतात. अशा उत्पादनांपासून पूर्णतः दूर राहावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारची पेये ही सर्वांसाठीच लाभदायक नसतात.