आरोग्य

स्तनपान : तंत्र आणि मंत्र | पुढारी

Pudhari News

डॉ. प्रीती देशमुख

आईचे दूध (स्तन्य) म्हणजे आईकडून बाळाला सुदृढ, समृद्ध आयुष्यासाठी मिळणारी अमूल्य भेटच आहे. यशस्वी स्तनपान हा बाळाच्या निरोगी जीवनाच्या पायाभरणीचा महत्त्वाचा घटक आहे. ही स्तनपानाची अमूल्य भेट प्रत्येक बाळाला मिळवून देण्याची जबाबदारी आईसोबतच सर्व कुटुंबीयांची, डॉक्टरांची तसेच समाजाचीही आहे. यातूनच सुदृढ सशक्त बुद्धिमान समाजाची निर्मिती आपण भविष्यात करू शकू.

नवमाता या आजच्या धकाधकीच्या युगातील हिरकणीच आहेत. बहुतांश नवीन माता आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी उत्सुक असतात; परंतु अपुरे आणि अयोग्य मार्गदर्शन, स्तनपानाविषयी असणार्‍या गैरसमजुती, मातेचे वय, आरोग्य, गरोदरपणातील गुंतागुंती, प्रसूतीदरम्यान उद्भवणार्‍या अडचणी, नवीन जन्मलेल्या बाळाची जन्माच्या वेळची स्थिती, बाळाचे जन्माच्या वेळी असणारे वजन, हॉस्पिटलमध्ये आणि घरी गेल्यानंतरची आईची सपोर्ट सिस्टीम, दैनंदिन ताणतणाव, आर्थिक परिस्थिती, प्रसूतीनंतर अपुरी रजा या सर्व अडचणींवर मात करून यशस्वी स्तनपानासाठी प्रयत्न करणारी आई ही नक्कीच हिरकणीपेक्षा कमी नाही. म्हणून आईला या अडचणींवर मात करून यशस्वी स्तनपानासाठी मदत करणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. 

जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, राज्य शासन, बीपीएनआय यांसारख्या संस्था स्तनपानविषयक जागृतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत आणि स्तनपान जागृतीसाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. नवीन जन्मलेल्या बाळाला आईच्या दुधाद्वारे सर्वोत्तम शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक असणारी सर्व घटकद्रव्ये मिळतात. यशस्वी स्तानपानाद्वारे बालकांमधील कुपोषण आणि बालमृत्यू यांचे प्रमाण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या नक्कीच कमी होऊ शकते. 

आईचे दूध हे बाळासाठी पूर्णान्न आहे. यशस्वी स्तनपानाद्वारे जे फायदे बाळाला मिळतात ते सर्व फायदे आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दुधाने (पावडरच्या, गायीच्या, म्हशीच्या इत्यादी) बाळाला मिळत नाहीत. 

युनिसेफच्या निर्देशांनुसार गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षाचे पूर्ण होईपर्यंतचे 1000 दिवस हे बाळाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी या काळामध्ये आई आणि बाळ या दोघ़ांनाही उत्तम पोषण मिळणे गरजेचे आहे. यशस्वी स्तनपानाची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. 

जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि युनिसेफ यांनी शिशुपोषणाच्या मुख्य शिफारशी वर्णन केल्या आहेत. 

1. प्रसूतीनंतर लगेचच (साधारणत: पहिल्या 5 मिनिटांमध्ये) आईने बाळाला प्रथम अनावृत्त स्पर्श (skin to skin contact) द्यावा. प्रसूतीनंतर एक तासामध्ये स्तनपानास सुरुवात करावी. 

2. जन्मापासून पहिले 6 महिने पूर्ण होईपर्यंत बाळाला केवळ स्तनपान द्यावे (साखरेचे पाणी, मध, पाणी, इतर कोणतेही दूध, बाळगुटी इत्यादी काहीही नाही.) 

3. बाळ सहा महिन्यांचे पूर्ण झाल्यावर स्तनपानासोबतच बाळाला वाढीसाठी योग्य, घरगुती, मऊ, ताजा, घट्टसर, पुरेसा आणि स्वच्छतापूर्वक बनविलेला पूरक आहार द्यावा. तसेच बाळाच्या कमीत कमी दुसर्‍या वाढदिवसापर्यंत स्तनपान सुरू ठेवावे. 

4. स्तनपान करताना आणि बाळाला अन्न भरवताना बाळाशी सुसंवाद साधावा. 

या प्रकाराचे पोषण मिळालेले बाळ नक्कीच सुदृढ, निरोगी, बुद्धिमान असेल यात शंका नाही. 

यशस्वी स्तनपानासाठी तसेच स्तनपानामध्ये येणार्‍या अडचणींचे निराकरण करण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ आईला आणि बाळाला नक्कीच मदत करू शकतात. यासाठी प्रसूतीपूर्व मार्गदर्शन आणि प्रसूतीनंतर लवकरात लवकर या विषयातील तज्ज्ञांंचा सल्ला नक्कीच आई आणि बाळासाठी आणि यशस्वी स्तनपानासाठी मोलाचा ठरेल.

(लेखिका इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT