डॉ. स्नेहल माळी
दरवर्षी १ ते ७ ऑगस्ट हा कालावधी जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ॲक्शन (WABA) या संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जातो. २०२६ च्या सप्ताहाची ‘Breastfeeding for a Sustainable Start in Life – Strengthen what works ’ संकल्पना आहे.
आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रात अनेक अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असल्या तरी आईच्या दुधाची जागा कोणतीही औषधे, यंत्रणा किंवा कृत्रिम दूध घेऊ शकत नाहीत. विशेषतः अकाली जन्मलेली बाळे, अत्यल्प वजनाची बाळे आणि NICU (Neonatal Intensive Care Unit) मध्ये उपचार घेणारी नवजात बाळे यांच्यासाठी आईचे दूध हे खरे जीवनरक्षक औषध आहे.
स्तनपान : बाळासाठी पहिली नैसर्गिक लस
जन्मानंतर पहिल्या काही तासांत येणारे पिवळसर कोलोस्ट्रम हे बाळाचे पहिले संरक्षण कवच असते. त्यामध्ये अँटिबॉडीज, रोगप्रतिकारक पेशी, वाढीसाठी आवश्यक घटक आणि संसर्गापासून संरक्षण करणारे अनेक जैविक घटक असतात.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करावे. पहिले सहा महिने केवळ आईचे दूध द्यावे. त्यानंतर पूरक आहारासह दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे.
प्रीटर्म बाळांसाठी आईचे दूध का अत्यावश्यक?
३७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांची फुफ्फुसे, आतडी, मेंदू आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना संसर्ग, श्वसनाचा त्रास, फीडिंग इंटॉलरन्स आणि आतड्यांच्या गंभीर आजारांचा धोका जास्त असतो. अशावेळी आईचे दूध हे औषधासारखे कार्य करते.
त्याचे प्रमुख फायदे :
* Necrotizing Enterocolitis (NEC) चा धोका कमी होतो.
* सेप्सिस आणि इतर संसर्ग कमी होतात.
* वजन वाढ चांगली होते.
* मेंदूच्या विकासाला मदत होते.
* रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होऊ शकतो.
NICU मध्ये अनेकदा बाळ थेट स्तनाला लागू शकत नाही. अशा वेळी आईला दूध काढून ते बाळाला ट्यूब, कप किंवा चमच्याद्वारे दिले जाते. आईचे दूध सुरू ठेवणे हेच उपचाराचा महत्त्वाचा भाग असतो. बाळ NICU मध्ये दाखल झालेल्या आई-वडिलांसाठी तो काळ अत्यंत तणावपूर्ण असतो. बाळ इन्क्युबेटरमध्ये असते, विविध वायर आणि मॉनिटर्स जोडलेले असतात. अशा परिस्थितीत अनेक मातांना वाटते की, ‘माझे दूध आता उपयोगाचे नाही’ किंवा ‘बाळाला मशिनवर उपचार चालू आहेत, मग दूध कसे देणार?’ प्रत्यक्षात NICU मधील प्रत्येक थेंब आईचे दूध अमूल्य असते.
आरोग्यसेवकांनी अशा मातांना प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास प्रोत्साहित करणे, योग्य पंप वापरण्याचे प्रशिक्षण देणे, त्वचेचा त्वचेशी संपर्क शक्य तितका वाढवणे , मानसिक आधार देणे हे अत्यंत आवश्यक असते. कधी कधी आई गंभीर आजारी असते, दूध पुरेसे येत नाही किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे तात्पुरते आईचे दूध उपलब्ध होत नाही. अशा वेळी मानवी दूध बँक (Human Milk Bank) अत्यंत महत्त्वाची ठरते. मिल्क बँकेत निरोगी स्तनदा मातांकडून अतिरिक्त दूध संकलित केले जाते. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. दूध सुरक्षित पद्धतीने पाश्चराईज केले जाते. योग्य तापमानात साठवून गरजू नवजात बाळांना दिले जाते. विशेषतः अत्यल्प वजनाची बाळे, प्रीटर्म बाळे, आईपासून तात्पुरती वेगळी असलेली बाळे आणि गंभीर आजारी नवजात बाळे यांना याचा मोठा फायदा होतो.
मानवी दूध बँक ही केवळ दूध साठवण्याची व्यवस्था नसून ‘एका आईकडून दुसऱ्या बाळाला मिळणारे जीवनदान’ आहे.
आज अनेक रुग्णालयांमध्ये स्तनपान प्रोत्साहन कार्यक्रम राबविले जात आहेत. योग्य समुपदेशनामुळे अनेक माता यशस्वीपणे स्तनपान सुरू ठेवू शकतात. स्तनपान ही फक्त आईची जबाबदारी नसून कुटुंबानेही तितकीच काळजी घ्यायला हवी.
कुटुंबाने काय करावे?
* आईला पुरेशी विश्रांती द्यावी.
* पौष्टिक आहार उपलब्ध करून द्यावा.
* अनावश्यक सल्ले आणि भीती निर्माण करणारे गैरसमज टाळावेत.
* आईचा आत्मविश्वास वाढवावा.
२०२६ चा संदेश आपल्याला स्पष्टपणे सांगतो की स्तनपान हे आरोग्य, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तिन्ही दृष्टीने शाश्वत उपाय आहे. इतर कोणत्याही दुधाच्या तुलनेत आईचे दूध नेहमी ताजे, सुरक्षित, योग्य तापमानाचे आणि पर्यावरणपूरक असते. जे बाळासाठी उपयुक्त असते.
प्रीटर्म बाळे, NICU उपचार आणि मिल्क बँकेच्या युगातही आईच्या स्तनपानाचे महत्त्व पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. आधुनिक नवजात अतिदक्षता सेवा आणि आईचे दूध यांचा समन्वय झाल्यास अत्यंत लहान आणि गंभीर बाळांनाही निरोगी जीवनाची संधी मिळू शकते.