ब्रेन ट्यूमर अर्थात मेंदूतील गाठी हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार मानला जातो; मात्र या आजाराचे वेळीच निदान झाल्यास आणि योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो, तसेच त्याचे जीवनमानही सुधारता येते.
मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या पेशींच्या असामान्य वाढीला ब्रेन ट्यूमर म्हटले जाते. हे ट्यूमर साधे (सौम्य) किंवा कर्करोगाचे (घातक) असू शकतात. काही ट्यूमर थेट मेंदूतच (प्रायमरी) तयार होतात, तर काही शरीराच्या इतर भागांतून मेंदूपर्यंत पसरतात (सेकंडरी किंवा मेटास्टॅटिक).
ब्रेन ट्यूमरमुळे मेंदूच्या सामान्य कार्यावर गंभीर परिणाम होतो आणि त्यावर तातडीने उपचार न केल्यास मोठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा येतो, म्हणूनच ब्रेन ट्यूमरला त्वरित आणि योग्य उपचारांची गरज असते.
ब्रेन ट्यूमरचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. तथापि, काही घटक या आजाराचा धोका वाढवू शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो:
- कौटुंबिक इतिहास : कुटुंबात कुणाला ब्रेन ट्यूमर झालेला असल्यास.
- रेडिएशनचा संपर्क : दीर्घकाळ रेडिएशनच्या (किरणोत्सर्ग) संपर्कात येणे.
- कमकुवत प्रतिकारशक्ती : शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे.
- अनुवांशिक स्थिती : न्यूरोफायब्रोमेटोसिससारखे काही विशिष्ट अनुवांशिक आजार.
- इतर घटक : धूम्रपान आणि काही विशिष्ट पर्यावरणीय घटकांचा संपर्क.
- ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो; परंतु त्याचा प्रकार आणि मेंदूतील त्याचे स्थान प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकते.
ब्रेन ट्यूमरची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत, जी वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
- सतत आणि तीव्र डोकेदुखी (विशेषतः सकाळी झोपेतून उठल्यावर जास्त त्रास होणे.)
- मळमळणे आणि वारंवार उलट्या होणे.
- द़ृष्टी धूसर होणे किंवा एका वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे (दुहेरी द़ृष्टी)
- अचानक आकडी (फिट) येणे.
- स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळल्यासारखे होणे.
- बोलण्यात किंवा वागणुकीत अचानक बदल जाणवणे.
- शरीराच्या एखाद्या भागात अशक्तपणा किंवा बधिरपणा येणे.
- शरीराचा तोल सांभाळण्यात किंवा कामात समन्वय साधण्यात अडचण येणे.
- ही लक्षणे अनेकदा इतर सामान्य आरोग्य समस्यांसारखीच असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, ब्रेन ट्यूमरच्या यशस्वी निदानासाठी आणि रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
ब्रेन ट्यूमरवर वेळीच उपचार न केल्यास खालील गंभीर समस्या उद्भवू शकतात.
- मेंदूला कायमस्वरूपी इजा पोहोचू शकते.
- संवाद साधणे, हालचाल करणे किंवा द़ृष्टी कमी होणे यासारख्या समस्या येऊ शकतात.
- व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो.
- कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरण्याचा धोका वाढतो.
- अखेरीस मृत्यूही ओढवू शकतो.
- मेंदूचे कार्य आणि क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.
- ट्यूमरचा आकार कमी करता येतो किंवा त्याची वाढ थांबवता येते.
- रुग्णाच्या जगण्याची शक्यता सुधारते.
- दीर्घकालीन अपंगत्व येण्याची शक्यता कमी होते.
- रुग्णाच्या जीवनाचा दर्जा सुधारतो.
वेळीच उपचार मिळाल्यास रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला एक नवी आशा मिळते. ट्यूमरमुळे शरीराचे गंभीर नुकसान होण्यापूर्वीच डॉक्टरांना उपचारांची प्रभावी योजना आखता येते.
सुरुवातीच्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष देणे आणि ती दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे कोणाचा तरी जीव वाचवू शकते. नियमित आरोग्य तपासणी, ब्रेन ट्यूमरविषयी जागरूकता आणि वेळीच उपचार हे या आजाराचे योग्य व्यवस्थापन करण्यास आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला वर नमूद केलेली कोणतीही असामान्य न्यूरोलॉजिकल लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.