Brain science children | मेंदूचे शास्त्र आणि मुलांची आकलनक्षमता 
आरोग्य

Brain science children | मेंदूचे शास्त्र आणि मुलांची आकलनक्षमता

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्राजक्ता पाटील

मूल जन्माला येते तेव्हा ते अफाट मानसिक क्षमता आणि कुतूहल घेऊन येते. शिक्षणातील प्रगत संशोधनानुसार, वयाची पहिली सात वर्षे बालकाच्या संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) विकासासाठी अत्यंत संवेदनशील असतात. योग्य वेळी योग्य दिशा न मिळाल्यास या नैसर्गिक क्षमता काळाच्या ओघात सुप्त राहण्याची भीती असते.

केवळ शालेय तयारी नव्हे, तर मुलाच्या सर्वांगीण सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी ‘अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन’ हा एक भक्कम पाया ठरतो.

उजवा आणि डावा मेंदू : कार्याची विभागणी

आपल्या मेंदूचे कार्य दोन भागांत विभागलेले असते. डावा मेंदू प्रामुख्याने तर्कशास्त्र, भाषा, गणितीय विचार आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी ओळखला जातो. याउलट, उजवा मेंदू हा सर्जनशीलता, भावना आणि अंतर्ज्ञानाचा केंद्रबिंदू असतो. वयाच्या 3 वर्षांपर्यंत मुलांच्या मेंदूमध्ये उजव्या भागाचे वर्चस्व असते. या काळात मुले एखाद्या गोष्टीचे आकलन तर्कापेक्षा अंतःप्रेरणेतून अधिक वेगाने करतात. दुर्दैवाने, आपली सध्याची शिक्षण पद्धती प्रामुख्याने डाव्या मेंदूवर लक्ष केंद्रित करते. जर आपण सुरुवातीच्या वर्षांत उजव्या मेंदूला चालना दिली, तर मुलांमध्ये एक आगळी ‘ब्रेन सिनर्जी’ निर्माण होते, जी त्यांना जगाकडे पाहण्याचा एक वेगळा द़ृष्टिकोन देते.

शून्य ते सात वर्षे वयोगटात उजव्या मेंदूचा वेग डाव्या मेंदूच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त असतो. जेव्हा आपण जलद गतीने मेंदूला माहिती पुरवतो, तेव्हा उजवा मेंदू सक्रिय होतो. यामुळे केवळ स्मृती आणि एकाग्रताच वाढत नाही, तर मुलांची आकलनशक्ती, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता देखील सुधारते.

घरीच काही सोप्या उपक्रमांतून आपण मुलांच्या उजव्या मेंदूला प्रशिक्षित करू शकतो. यात ‘फ्लॅशकार्डस्’चा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. एका कार्डवर एकच स्पष्ट चित्र असलेला संच मुलांसमोर सेकंदाला दोन कार्डे या वेगाने सादर केल्यास त्यांची द़ृश्य स्मृती (व्हिज्युअल मेमरी) तल्लख होते. याशिवाय, रंगांच्या जोड्या लावणे, कोडी सोडवणे किंवा मुक्त खेळांच्या माध्यमातून मुलांना व्यक्त होऊ देणे आवश्यक आहे. एक मजेशीर प्रयोग म्हणून, मुलांना त्यांच्या न वापरल्या जाणार्‍या हाताने (उदा. उजव्या हाताने काम करणार्‍या मुलाने डाव्या हाताने) छोटी कामे करण्यास प्रोत्साहन द्यावे, ज्यामुळे मेंदूला नवीन आव्हाने मिळतात.

या संपूर्ण प्रक्रियेत पालकांची भूमिका केवळ शिक्षकाची नसून एका मार्गदर्शकाची आहे. मुलांचा त्यांच्या पालकांशी असलेला स्नेहपूर्ण संबंध हा त्यांच्या शिक्षणाचा मुख्य आधार असतो. जेव्हा मुलाला सुरक्षित आणि आनंदी वातावरण मिळते, तेव्हा त्याचा मेंदू माहिती स्वीकारण्यास अधिक सक्षम होतो. ‘टिकल राईट’ सारख्या व्यासपीठांनी भारतात या संकल्पनेला अधिक व्यापक केले आहे. हे उपक्रम केवळ मुलांच्या बुद्धीला चालना देत नाहीत, तर पालक आणि मुलांमधील नाते अधिक द़ृढ करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT