डॉ. मनोज कुंभार
बाथरूममध्ये साधे घसरून पडणे, छोटा रस्ता अपघात किंवा क्रिकेटचा चेंडू जोराने डोक्याला लागणे अशा किरकोळ व अनपेक्षित गोष्टींमुळे मेंदू या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या भागाला गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
काही वेळा याची लक्षणे लगेच दिसतात, तर कधीकधी ती हळूहळू समोर येतात. या दुखापतींचे गांभीर्य केवळ सुरुवातीच्या जखमेवर अवलंबून नसते, तर त्यानंतर होणार्या दीर्घकालीन परिणामांवर असते. मेंदू हा शरीराचे नियंत्रण केंद्र असल्याने, या इजेचा परिणाम व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर, हालचालींवर आणि वर्तनावर होतो.
जेव्हा एखाद्या बाह्य धक्क्यामुळे मेंदूला इजा होते, तेव्हा त्याला ‘टीबीआय’ असे म्हणतात. हा धक्का एखाद्या वस्तूचा मारा, जोराचा झटका किंवा कवटीला छेद देणार्या गोष्टीमुळे असू शकतो. यामुळे मेंदूच्या सामान्य कामकाजात तात्पुरता किंवा कायमस्वरूपी अडथळा निर्माण होतो.
पडणे, रस्ते अपघात, खेळातील जखमा किंवा हिंसक हल्ले ही याची मुख्य कारणे आहेत. हे कोणत्याही वयोगटात होऊ शकते; वृद्ध व्यक्ती घरात पडल्यामुळे, लहान मुले खेळताना आदळल्यामुळे किंवा तरुण पिढी वाहन अपघातामुळे याला बळी पडू शकते.
प्रत्येक मेंदूची इजा सारखी नसते. ‘माईल्ड टीबीआय’ किंवा ‘कन्कशन’मध्ये चक्कर येणे किंवा काही काळ अंधारी येणे असे प्रकार घडतात, जे विश्रांतीने बरे होऊ शकतात. मध्यम स्वरूपाच्या जखमांमध्ये शुद्ध हरपण्याचे प्रमाण जास्त असते. गंभीर जखमांचे परिणाम मात्र विचार करण्याच्या प्रक्रियेवर आणि हालचालींवर कायमस्वरूपी होऊ शकतात. काही वेळा कवटीला इजा न होता अंतर्गत जखम होते (क्लोज्ड टीबीआय), तर काही वेळा कवटीला छिद्र पडते (पेनिट्रेटिंग टीबीआय). दोन्ही परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते.
कार्यक्षमतेत अडथळा दुखापत होताच मेंदूच्या पेशींमधील संदेशवहन थांबते. रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा मंदावतो. मेंदूच्या ऊतींना सूज येते किंवा त्या ताणल्या जातात. यामुळे गोंधळ उडणे, अंधूक दिसणे, तोल जाणे किंवा शुद्ध हरपणे यांसारखे प्रकार घडतात.
मेंदूला सूज आणि रक्त साठणे मेंदू कवटीच्या आत अगदी घट्ट बसवलेला असतो. जर त्याला सूज (सेरेब्रल इडेमा) आली, तर त्या दबावामुळे निरोगी पेशींचे नुकसान होते. तसेच, कवटी आणि मेंदूच्या दरम्यान रक्ताची गुठळी (हेमॅटोमा) तयार झाल्यास मेंदूवर दाब वाढतो. अशा वेळी वेळेवर उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
विशिष्ट भागांचे नुकसान मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळी कामे करतात. ‘फ्रंटल लोब’ला इजा झाल्यास निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनांवरचे नियंत्रण सुटते. ‘टेम्पोरल लोब’ बाधित झाल्यास स्मरणशक्ती आणि बोलण्यात अडचणी येतात. ‘ब्रेनस्टेम’ला इजा झाल्यास श्वासोच्छवास आणि हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होऊन जीव धोक्यात येऊ शकतो.