डॉ. संतोष काळे
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात एका नऊ वर्षांच्या मुलीचा अतिशय दुर्मीळ आणि धोकादायक ब्रेन इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला आहे. या आजाराला ‘अमिबिक मेनिन्जोएन्सेफलाइटिस’ असे म्हटले जाते. हा संसर्ग नेगलेरिया फाऊलेरी नावाच्या एका फ्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो, ज्याला ‘ब्रेन ईटिंग अमिबा’ असेही संबोधले जाते.
हा अमिबा दूषित आणि उष्ण गोड्या पाण्यात आढळतो. केरळमधील मुलीचा मृत्यू हा काही पहिलाच प्रकार नाही. माध्यमांच्या अहवालानुसार केरळमध्ये ब्रेन ईटिंग अमिबामुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे. याचा धोका कोणालाही होऊ शकतो, म्हणून त्याविषयी माहिती घेणे आणि बचावाचे उपाय समजून घेणे फार महत्त्वाचे ठरते.
हा मेंदूला होणारा अतिशय गंभीर संसर्ग असून तो नेगलेरिया फाऊलेरी या अमिबामुळे होतो. हा अमिबा प्रामुख्याने तळे, नदी किंवा अशा उष्ण व दूषित गोड्या पाण्याच्या ठिकाणी आढळतो. जेव्हा एखादी व्यक्ती अशा पाण्यात पोहते किंवा डुबकी मारते तेव्हा हा अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि सरळ मेंदूपर्यंत पोहोचतो. तेथे तो मेंदूच्या ऊतींवर (टिश्यू) वेगाने आक्रमण करून त्यांचा नाश करतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्याकडे पसरत नाही.
हा आजार अतिशय झपाट्याने वाढतो आणि जवळपास नेहमीच घातक ठरतो. संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर साधारण एक ते बारा दिवसांत रुग्णाची प्रकृती अत्यंत खालावते आणि बहुतांश वेळा पाच दिवसांत मृत्यू होतो.
गढूळ अथवा स्थिर किंवा साचलेल्या गोड्या पाण्यात पोहणे किंवा डुबकी मारणे टाळावे. अशा पाण्यात पोहताना नाक घट्ट बंद ठेवावे किंवा नोज क्लिपचा वापर करावा. नाक स्वच्छ करण्यासाठी नेति पॉट सारख्या साधनांचा वापर करताना फक्त उकळलेले किंवा डिस्टिल्ड पाणीच वापरावे. अंघोळीनंतर जर अचानक डोकेदुखी, ताप किंवा गोंधळल्यासारखे वाटू लागले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या आजारासाठी कोणताही ठोस व निश्चित उपचार उपलब्ध नाही. मात्र संसर्गाची लवकर ओळख पटली आणि तातडीने उपचार सुरू झाले तर थोडीफार जीविताची शक्यता वाढते. डॉक्टर अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबियल औषधांचा वापर करून लक्षणे नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातही यश फारच दुर्मीळ असते.
ब्रेन ईटिंग अमिबामुळे संसर्ग झाल्यावर अचानक तीव्र ताप, डोकेदुखी, मळमळ, उलटी, मान आखडणे, गोंधळणे, फिटस् येणे आणि कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. याचा धोका विशेषतः मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये अधिक असतो, कारण तेच अशा पाण्यात पोहणे किंवा खेळणे पसंत करतात.