डॉ. वसुंधरा अग्रवाल
रक्तातील ग्लुकोज कमी झाल्यावर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. कारण, मेंदूला ऊर्जेसाठी प्रामुख्याने ग्लुकोजची गरज असते आणि मेंदू स्वतः ग्लुकोज साठवून ठेवू शकत नाही.
मानवी मेंदूचे वजन शरीराच्या एकूण वजनाच्या केवळ दोन टक्के असले, तरी शरीरातील एकूण ग्लुकोजच्या पुरवठ्यापैकी सुमारे वीस टक्के भाग मेंदू वापरतो. न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या एका संशोधनानुसार, चेतापेशींच्या कार्यासाठी ग्लुकोज अत्यंत आवश्यक असते. शरीरातील साखरेची पातळी थोडी जरी खालावली, तरी मेंदूच्या कामावर परिणाम होऊन चिडचिड, गोंधळलेली अवस्था किंवा बोलताना शब्द अडखळणे अशा समस्या सुरू होतात. स्नायू किंवा यकृताप्रमाणे मेंदूकडे साखरेचा राखीव साठा नसल्याने तो या बदलांबाबत अत्यंत संवेदनशील असतो.
कमी रक्तशर्करा असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला अशक्तपणा, जास्त घाम येणे, अचानक भूक लागणे आणि हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास द़ृष्टी धूसर होणे, डोकेदुखी आणि एकाग्रता साधण्यास अडचण येणे असे त्रास उद्भवतात. गंभीर परिस्थितीत फिटस् येणे किंवा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक ठरते.
वेळेवर जेवण न घेणे हे हायपोग्लायसेमियाचे सर्वात मुख्य कारण आहे. याशिवाय अतिप्रमाणात रिफाईंड कार्बोहायड्रेटस्चे सेवन केल्याने साखर एकदम वाढून पुन्हा झपाट्याने कमी होते. मधुमेही व्यक्तींमध्ये इन्सुलिनच्या चुकीच्या प्रमाणामुळे हा त्रास होऊ शकतो. मात्र, तणाव, अपुरी झोप किंवा विशिष्ट आजारांमुळे मधुमेही नसलेल्या व्यक्तींनाही रक्तातील साखर कमी होण्याचा त्रास होऊ शकतो.
रक्तातील साखर कमी झाल्याचे जाणवले, तर त्वरित 15 ग्रॅम ग्लुकोज पावडर, फळांचा रस किंवा साखर खाणे फायदेशीर ठरते. रक्तातील साखर स्थिर झाल्यावर प्रथिने आणि कर्बोदकेयुक्त आहार घ्यावा. हा त्रास टाळण्यासाठी दर तीन ते चार तासांनी संतुलित आहार घेणे, आहारात फायबर आणि निरोगी चरबीचा समावेश करणे आवश्यक आहे. अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवावे आणि पुरेशी झोप तसेच तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा. वारंवार असा त्रास होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखरेची तपासणी करून घेणे हिताचे ठरते.