Baby Tooth Decay canva
आरोग्य

Baby Tooth Decay | रात्री दुध पाजण्याची सवय ठरते लहान बाळांच्या दात किडीचे मुख्य कारण

Baby Tooth Decay | लहान मुलांचे दात किडणे हा आजकाल फारच सामान्य प्रश्न झाला आहे. अनेक पालक आपल्या बाळाला झोपताना दूध देतात, जेणेकरून बाळ पटकन झोपी जाईल.

पुढारी वृत्तसेवा

Baby Tooth Decay

लहान मुलांचे दात किडणे हा आजकाल फारच सामान्य प्रश्न झाला आहे. अनेक पालक आपल्या बाळाला झोपताना दूध देतात, जेणेकरून बाळ पटकन झोपी जाईल. पण हाच सवयीचा भाग पुढे जाऊन दातांच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतो. दात किडणे (Tooth Decay) लवकर होणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे आणि पुढे जाऊन दात गळणे अशा समस्या या सवयीमुळे दिसून येतात.

रात्री दूध पिणे आणि दात किडीचा संबंध

याविषयावर आम्ही बालदंततज्ज्ञ नुपुर कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी सांगीतले कि, रात्री दूध पिण्याची सवय अनेक घरांमध्ये कॉमन आहे. दूधामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच लॅक्टोज असते. जेव्हा बाळ दूध पिऊन लगेच झोपते, तेव्हा ती साखर बाळाच्या दातांवर चिकटून राहते. रात्री झोपेत तोंडातून लाळ कमी प्रमाणात स्रवते, त्यामुळे ही साखर तोंडात तशीच राहते आणि जंतूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. परिणामी, दातांवर प्लाक तयार होतो आणि हळूहळू दात किडायला सुरुवात होते.

बाळांच्या दात किडीची सुरुवातीची लक्षणे

  • दातांवर पांढरे किंवा पिवळसर डाग दिसणे

  • दातांवर तपकिरी किंवा काळे डाग पडणे

  • दात घासताना किंवा खाण्याच्या वेळी त्रास होणे

  • बाळ सतत चिडचिड करणे किंवा रात्री रडणे

  • खाण्याची इच्छा कमी होणे

पालकांनी ही लक्षणे सुरुवातीला ओळखणे गरजेचे आहे. कारण वेळेत काळजी घेतली नाही, तर पुढे जाऊन दात गळण्याची शक्यता वाढते.

दात किडीपासून संरक्षण कसे करावे?

  • रात्री दूध पाजल्यानंतर तोंड स्वच्छ करणे: बाळाचे दात आणि हिरड्या मऊ कापडाने किंवा गॉजने पुसून स्वच्छ करावेत.

  • साखर मिसळलेले दूध टाळा: रात्रीच्या वेळी गोड केलेले दूध देणे टाळावे, कारण त्यामुळे दातांवर साखरेचा थर जास्त प्रमाणात राहतो.

  • झोपताना दूधाची बाटली तोंडात ठेवू नका: यामुळे दूध तोंडात साठते आणि जंतू वाढण्याचा धोका जास्त होतो.

  • पाणी पाजण्याची सवय लावा: दूधानंतर थोडे पाणी पाजल्याने तोंडातील दूधाचे अवशेष निघून जातात.

  • लहान वयापासून दात घासण्याची सवय: बाळाला १ वर्षाच्या वयानंतर लहान मुलांसाठी असलेल्या मऊ ब्रशने दात घासायला सुरुवात करावी.

डॉक्टरांचा सल्ला घेणे का महत्त्वाचे?

पालकांना जर बाळाच्या दातांवर काळे डाग, वास, किंवा सूज जाणवत असेल, तर बालदंततज्ज्ञांचा (Pediatric Dentist) सल्ला घेणे आवश्यक आहे. ते योग्य ट्रीटमेंट करून पुढील नुकसान टाळू शकतात.

रात्री दूध पाजणे ही सवय सोपी वाटली तरी तिचा परिणाम गंभीर असू शकतो. बाळाच्या दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी पालकांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य स्वच्छता, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला, आणि दूधानंतर पाणी पाजणे या छोट्या सवयी मुलांचे दात निरोगी ठेवतात आणि पुढील आयुष्यातील दंत समस्या कमी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT