पालकत्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाळ रडताच अनेक पालक लगेच त्याला दूधाची बाटली देतात. मात्र प्रत्येक वेळी रडण्यामागचं कारण भूकच असतं असं नाही. बालरोगतज्ज्ञांच्या मते, नवजात आणि लहान मुलांच्या रडण्याची अनेक कारणं असू शकतात. प्रत्येक वेळी दूध देऊन त्यांना शांत करणं त्यांच्या आरोग्यासाठी आणि सवयींसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे रडण्यामागचं नेमकं कारण समजून घेणं गरजेचं आहे.
१. थकवा आणि झोपेची गरज
लहान मुलं जास्त वेळ जागी राहिल्यास चिडचिड करू लागतात आणि रडायला लागतात. अशावेळी त्यांना दूध नको असतं तर फक्त झोप हवी असते.
२. डायपर ओलसर किंवा त्वचेवर रॅशेस
ओलसर डायपरमुळे किंवा त्वचेवर खाज आल्यानं बाळ अस्वस्थ होतं आणि रडतं. अशावेळी त्यांना स्वच्छता हवी असते, दूध नव्हे.
३. गॅस किंवा पोटदुखी
नवजात बाळांमध्ये गॅस होणं सामान्य आहे. अशावेळी ते दूध पित नाहीत आणि सतत रडतात. सौम्य पोट मसाज किंवा डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो.
४. कधीकधी बाळाला आई-वडिलांचा स्पर्श हवा असतोकधी
कधी बाळ फक्त आई किंवा वडिलांच्या कुशीत राहताच शांत होतं. अशावेळी त्यांना भूक नसते, तर फक्त आपुलकीचा स्पर्श हवा असतो.
५. तापमानातील अस्वस्थता
लहान मुलं खूप संवेदनशील असतात. जास्त उष्णता किंवा थंडीमुळेही त्यांना त्रास होतो आणि ते रडतात. त्यामुळे घरातलं तापमान योग्य आहे का हे तपासावं.
६. ओव्हरफीडिंगचाही धोका
रडल्यावर प्रत्येक वेळी दूध दिल्यास ओव्हरफीडिंग होऊ शकतं, ज्यामुळे बाळाला उलटी, गॅस किंवा पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे बाळ रडलं की लगेच दूध देण्याऐवजी त्याच्या हालचाली, हावभाव आणि बाकी लक्षणं समजून घ्या.
हळूहळू तुम्हाला समजेल की त्याचं रडणं भुकेमुळे आहे की दुसऱ्या कोणत्या कारणामुळे. बाळ रडलं की लगेच दूध देणं टाळा; आधी त्याचं निरीक्षण करा, कारण तुमचं लक्ष आणि समजूत हेच त्याच्या आरोग्याचं खरं रक्षण करू शकतात.