डॉ. रचना पाटील-जाधव
आयुर्वेद ही जगातील सर्वात उत्तम उपचार पद्धती आहे. आयुर्वेदिक औषधांचे शरीरावर कोणतेच विपरीत परिणाम होत नाहीत. आयुर्वेदात फक्त शाकाहारी उपचार सांगितले आहेत आणि मांसाहार पूर्णपणे वर्त्य सांगितला आहे असा काहींचा ठाम समज आहे. म्हणून मांसाहार करावा की नाही याबद्दल बन्याच जणांच्या मनात शंका असते. आपल्या आहारावर धार्मिक पगडा आहे. तरीही आयुर्वेदाने मात्र रुग्णाचा विचार करताना मांसाहार ही महत्त्वाचा मानला आहे.
चरकानुसार आहार योग्य असेल तरच औषधांचा रुग्णाच्या शरीरावर योग्य परिणाम होऊन व्याधी नष्ट होईल. आहाराशिवाय औषधांचा शरीरावर परिणाम होत नाही. रोग्याचे आरोग्य सुधारण्यासाठी मांसाहारसुद्धा उपयुक्त आहे. म्हणून काही व्याधींमध्ये मांसाहारी पदार्थांचे उपचारसुद्धा सांगितले आहेत.
अन्नं वृत्तिकारण श्रेश्ठं, क्षिरं जिवानियाम, मासं बृहानियामम् – चरकसंहिता अर्थ : अन्न हे सर्वश्रेष्ठ आहार आहे. दूध जीवनदान देण्यात श्रेष्ठ आहे आणि मांस हे शरीर पुष्टी करण्यात श्रेष्ठ आहे. चरकानुसार आहाराचे 12 प्रकार सांगितले आहेत. त्यातही मांस वर्गाचा तिसर्या क्रमांकावर समावेश आहे. 1. शुक धान्ये – यात गहू, हरभरा, जव यांसारख्या धान्याचा समावेश होतो. 2. शमी धान्ये – यात मूग, मसूर, तूर आदी डाळींचा समावेश होतो.
3. मास वर्ग. ( चरक संहिता, सुत्रस्थान अध्याय 27 ) आयुर्वेद हे रोग होण्यापेक्षा रोग होऊ नये यावर जास्त भर देते. मानवी शरीर हे वात, पित्त, कफ दोषांनी युक्त आहे. व्याधी होऊ नये म्हणून तसेच उत्तम.. आरोग्यासाठी व दोषांचे संतुलन राखण्यासाठी व्याधी होण्यापूर्वीचा आहार हा शाकाहारी म्हणजेच सात्विक असावा, यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेली औषधे, तसेच ऋतूनुसार आहार, दूध, दही, तूप, मध, फळे व पंचकर्म यावर भर आहे. म्हणून आयुर्वेदात सांगितलेला मांसाहार हा व्याधी झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी एक उपचार पद्धती म्हणून करावयाचा आहे आणि काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे. ज्या प्रकारचा आहार आपण सेवन करतो त्या प्रकारची आपली मनोवृत्ती व स्वभाव असतो. याचे वर्णन आयुर्वेदात आहे. मांसाहार करणारे लोक हिंसक, रागीट, चिडचिडे स्वभावाचे असतात. याला आयुर्वेदात राजसिक आहार खाल्ल्याने होणारी राजसिक प्रवृत्ती म्हणतात. पण कोणत्या प्रकारचे मांस खावे, ते कसे शिकवावे, ते कसे खावे, यावर ते अवलंबून आहे. ब्रॉयलर कोंबडी, वाळवलेले, खारवलेले मांस, बोंबील, कोळंबी हा मांसाहार शरीराला उपयुक्त न ठरता त्रासदायक आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले मांस हे पचायला हलके व शरीराला ऊर्जा देणारे असते. गायीचे मांस हे त्रिदोषकारक म्हणजेच शरीरातील दोष दूषित करणारे असते आणि या मांस सेवनाने होणारे आजार हे त्रासदायक व बरे न होण्यासारखे असतात. क्षयरोग, रक्तक्षय, जुनाट आजार, कृशता, थकवा, शारीरिक दौर्बल्य, स्नायू दौर्बल्य हे मांसाच्या सेवनाने लगेच कमी होतात. म्हणून यामध्ये मांसाहार सेवन अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेद चिकित्सेत पंचकर्म करताना जे तेल, तूप सदृश पदार्थ सांगितले आहेत, त्यात चरबी आणि मज्जा (हाडाच्या पोकळीतील पदार्थ) यांचे सेवन सांगितले आहे. मटणाच्या पातळ रश्श्याचे महत्त्व सांगितले असून त्यासोबत मटणाचे तुकडे न देण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ व्याधी झाल्यानंतर एक औषध म्हणून मांस सेवन उपयुक्त आहे. म्हणून मांसाहार हा धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानला असला तरी आयुर्वेदाने मांसाहाराला वर्ल्स ठरवलेले नाही.