Avoid Overeating | टाळा अतिखादाडपणा  
आरोग्य

Avoid Overeating | टाळा अतिखादाडपणा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय गायकवाड

दिवाळीसारख्या सणासुदीला मिष्टान्न भोजन, फराळावर आडवा हात मारण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. एरवीही आवडीचा आहार असेल, तर अनेक जण मागे-पुढे न पाहता खातात, ज्याला आपण अतिखाणे म्हणू शकतो. लग्नादी समारंभात असेच अतिखाणे होते. त्यानंतर बद्धकोष्ठता, गॅसेस निर्माण होतात.

तज्ज्ञांच्या मते अतिखाणे कधी कधी होणे ठीक आहे. त्यात काही अडचण नाही; पण अतिखाणे ही जर आपली सवय असेल, तर शरीराचे नुकसान होते. अतिखाणे हे शरीर आणि पचनसंस्था दोन्हींच्या दृष्टिकोनाने ठीक नाही. जास्त खाणे किंवा अतिखाणे हे त्रासदायकच ठरते.

पोटाची समस्या : शरीरात आहार पचायला सुरुवात झाली की, आतड्यांमध्ये खूप वायू किंवा गॅस निर्माण होतो. असा वायू तयार झाल्यामुळे पादणे, ढेकर देणे आणि पोटदुखी या सर्व गोष्टी आपल्याला जाणवतात. आहार खूप मसालेदार आणि तेलकट असेल, तर छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.

सुस्ती येते : अतिआहारामुळे खूप थकवा येतो. जरा झोपूया असे वाटते. अशावेळी आतडे मेंदूकडे संदेश पाठवतो की, शरीराला आरामाची गरज आहे. रक्तातील इन्सुलिन वाढते आणि सुस्ती जाणवते.

मूत्रपिंड निकामी होणे- अतिखाण्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा गंभीर मूत्रपिंडाचे आजार होण्याचा धोका आहे. अतिखाण्यामुळे वजन वाढते. त्यामुळे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय वाढतो. यामुळेच शरीरात प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त होते आणि ते पचवण्यासाठी मूत्रपिंडाला खूप जास्त मेहनत करावी लागते. यामुळे मेद किंवा चरबी वाढल्याने मेटाबोलिझम किंवा चयापचयाचा दर घटतो. किडनी फेल होण्याची शक्यता असते.

वजन वाढते : शरीरात लेप्टिन नावाचे एक हार्मोन असते, जे जेवल्यानंतर तयार होते. शरीराला किती ऊर्जा लागते आणि शरीरात किती ऊर्जा असते, हे या हार्मोनमुळे कळते. जेव्हा आपण अतिप्रमाणात खातो तेव्हा हे हार्मोन अधिक प्रमाणात तयार होते. जे थेट चरबीशी निगडीत असते. अति खाण्यामुळे शरीर लेप्टिनला थांबवते. त्यामुळे मेंदूला हे कळत नाही की, आपले पोट भरले आहे की नाही. मग, व्यक्ती जास्त जेवते आणि वजन वाढते.

हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो : पोट भरल्यानंतरही खात राहिल्यास जोपर्यंत आपण खाणे थांबवत नाही तोपर्यंत मेंदूपर्यंत खूप जास्त संदेश जातात. याच दरम्यान हृदयापर्यंत संदेश जातो की, पोटाकडे रक्ताचा प्रवाह वाढवला पाहिजे, जेणेकरून आहार पचण्यास मदत होते. हृदयाची धडधड वाढल्याने चयापचयाचा वेग वाढतो. त्यामुळे व्यक्तीला घाम येतो आणि गरम होऊ लागते. काही वेळा व्यक्तीला चक्कर येऊ शकते.

अतिखाण्यापासून बचाव कसा? : तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कॅलरी जळतात. अर्थात, त्यासाठी फक्त जिमला जाऊनच व्यायाम करायला हवा असेही नाही. चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा नृत्यही करू शकतो. त्याशिवाय अन्न हळूहळू चावून चावून खावे. तणावामुळे जास्त आहार सेवन करत असाल, तर कदाचित आपण नैराश्यग्रस्त असू शकता. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण, मानसिक अवस्थेचा परिणाम शरीरावरही होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT