डॉ. मनोज शिंगाडे
आपल्यापैकी बरेच जण जोपर्यंत गुडघे दुखू लागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, जेव्हा वेदना सुरू होतात तेव्हा अनेकदा गुडघ्यांचे नुकसान झालेले असते. म्हणूनच गुडघ्यांची काळजी ही वृद्धापकाळात नाही तर किशोरवयीन अवस्था आणि विशी-तिशीमध्येच घेणे आवश्यक आहे.
चालणे, धावणे, पायर्या चढणे किंवा साधे बसणे-उठणे या प्रत्येक क्रियेत आपले गुडघे सतत कार्यरत असतात. गुडघ्यांच्या आजारांबाबत जनजागृती कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यातील बिघाड लगेच लक्षात येत नाही. अनेकदा संधिवात किंवा सांधेदुखीला केवळ वाढत्या वयाशी जोडले जाते, त्यामुळे तरुण पिढी याकडे दुर्लक्ष करते.
भारतामध्ये गुडघ्याचा संधिवात ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. एका ताज्या अहवालानुसार 60 वर्षांवरील सुमारे 47 टक्के ज्येष्ठांना गुडघ्याच्या सांधेदुखीचा त्रास आहे. विशेषतः, महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक दिसून येते. 2050 पर्यंत भारतातील वृद्धांची संख्या 19 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याने आरोग्य व्यवस्थेवर याचा मोठा ताण येऊ शकतो. आधुनिक संशोधनानुसार योग्य सवयींच्या माध्यमातून आपण गुडघ्यांची झीज कमी करू शकतो आणि शस्त्रक्रिया 10 ते 15 वर्षांनी पुढे ढकलू शकतो.
तासन्तास बसून राहिल्यामुळे मांड्यांचे स्नायू कमकुवत होतात. हे स्नायू गुडघ्यांसाठी धक्के शोषून घेणार्या यंत्रणेसारखे काम करतात. जेव्हा हे स्नायू कमकुवत होतात तेव्हा गुडघ्याच्या सांध्यावर अतिरिक्त ताण येतो. यावर उपाय म्हणून दर 30 ते 40 मिनिटांनी थोडे चालणे किंवा हलके व्यायाम करणे फायदेशीर ठरते. याशिवाय शरीराचे वजन हे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराचे वजन 1 किलोने वाढले, तर चालताना गुडघ्यांवर 3 ते 4 किलो अतिरिक्त दाब पडतो. वजनात केलेली थोडीशी घट देखील गुडघ्यांच्या वेदनांमध्ये मोठी सवलत देऊ शकते.
चालण्याची चुकीची पद्धत, पायर्यांचा अवाजवी वापर आणि कमकुवत कंबर यामुळेही गुडघ्यांवर ताण येतो. व्यायाम करताना केवळ तीव्रतेवर भर न देता शरीराची योग्य स्थिती आणि स्नायूंची ताकद वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. वेदना ही शरीराने दिलेली धोक्याची पहिली सूचना असते. सुरुवातीच्या काळातच फिजिओथेरपी आणि योग्य हालचालींच्या मदतीने गुडघ्यांच्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. गुडघे अचानक निकामी होत नाहीत, तर ते वर्षानुवर्षे चुकीच्या जीवनशैलीमुळे खराब होत असतात. त्यामुळे शाश्वत बदल आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच गुडघ्यांच्या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहेत.