कॅफिनचा अतिरेक 
आरोग्य

टाळा कॅफिनचा अतिरेक

कॅफिनचा शरीरावर वाईट परिणाम

पुढारी वृत्तसेवा
डॉ. गौरांगी वैद्य

सकाळी पांघरुणात लोळतच एक कप गरम गरम चहा मिळाला, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. पण, कुठलीही गोष्ट प्रमाणात करणे, हेच आरोग्याच्या द़ृष्टीने चांगले असते. एखाद-दुसरा चहाचा कप घेणं इथपर्यंत ठीक आहे; पण काही लोक दिवसातून चार-सहा कप चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात. त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांचा मेंदू तरतरीत होतो आणि विचार करण्यासाठी उत्साह मिळतो. या समजुतीमुळे हळूहळू अशा व्यक्ती चहा- कॉफीच्या अधीन होतात. सकाळी सुस्ती जाण्यासाठी चहा हवा, दुपारच्या वेळी कंटाळवाणे वाटू नये म्हणून चहा हवा आणि संध्याकाळी तर चहा हवाच. म्हणजे जणू आपण चहा पिण्याचे वेगवेगळे बहाणेच शोधून काढले आहेत.

कॅफिनचे रासायनिक नाव आहे, टिमिथीलक्सेन्थाइन. कॅफिनचे शुद्ध रूप हे पांढर्‍या रंगाचे आणि चवीला कडू असणार्‍या पावडरीच्या रूपात असते. ही पावडर स्वाद वाढवण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्समध्येही टाकतात. बर्‍याचशा पानांमध्ये, फळांमध्ये आणि बिन्समध्ये नैसर्गिक रूपात कॅफिन आढळते. आपण कॅफिनयुक्त ड्रिंक्स किंवा चहा-कॉफी घेतो त्या वेळी रक्ताची गती वाढते. याच कारणामुळे आपल्याला आतून खूप ऊर्जायुक्त, उत्साही वाटू लागते. गमतीची गोष्ट म्हणजे कॅफिनचा परिणाम शरीरावर केवळ पाच-सहा तासांपर्यंतच राहतो. त्यानंतर ज्यावेळी हार्मोन्सचे प्रमाण पूर्ववत होते, तेव्हा तुम्ही आळस आणि झोपेच्या भावनेने ग्रासले जातात. तेव्हा आपल्याला पुन्हा चहाची गरज पडते. ही सवय हळूहळू वाढत जाऊन तुम्ही सतत चहा किंवा कॉफी पिऊ लागता आणि अशा प्रकारे त्यामुळे आपण कॅफिनवर निर्भर होत जाऊ लागतो.

कॅफिनचे प्रमाण शरीरात कोर्टीसोल (स्टिरॉईड हार्मोन्स)चे प्रमाण वाढवते. यामुळे शरीरात आरोग्यासंबंधीच्या बर्‍या प्रकारच्या तक्रारी निर्माण होतात. यामध्ये हृदयाशी संबंधित त्रास, मधुमेह, अनियमितता आणि वजन वाढण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. बरेचदा वेदना निवारण्यासाठी कॅफिनयुक्त पदार्थ खाल्ले किंवा पिले जातात. यामुळे डोकेदुखी, थकवा, मूड बदलणे म्हणजे निराशा किंवा गळून गेल्यासारखे वाटणे, एकाग्रतेत कमतरता येणे, भूक कमी लागणे, भ्रम होणे, स्मरणशक्ती कमी होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप इत्यादी त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच कॅफिनच्या विळख्यातून बाहेर पडणे, यातच आरोग्यहित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT