दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असला तरी, अनेक आरोग्य तज्ज्ञांनी या सणादरम्यान होणार्या प्रचंड वायुप्रदूषणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः दमा या श्वसनविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिवाळीतील फटाक्यांचा धूर जीवघेणा ठरू शकतो. दिवाळीच्या काळात प्रमुख शहरांत वायुप्रदूषण सामान्य दिवसांच्या तुलनेत तब्बल 4 ते 5 पटीने वाढते. याचा थेट धोका देशातील सुमारे 3.5 कोटी दमा रुग्णांना आहे. त्यामुळे दमा असलेल्यांनी फटाक्यांच्या धुरापासून दूर राहिले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.
दिवाळीत जास्तीत जास्त वेळ घरातच थांबा. खिडक्या आणि दारे बंद ठेवा, जेणेकरून बाहेरचा धूर आत येणार नाही. शक्य असल्यास प्रदूषणाची पातळी जास्त असलेल्या ठिकाणी प्रवास करणे टाळा. घराबाहेर पडल्यास 95 किंवा 99 सारख्या उच्च दर्जाचा मास्क वापरणे अनिवार्य आहे.
डॉक्टरांनी लिहून दिलेले सर्व आवश्यक औषधोपचार, विशेषतः तुमचा रिलीव्हर इनहेलर नेहमी सोबत ठेवा. इनहेलरचा वापर कसा करायचा, याची खात्री करा. तुमच्या दम्याच्या अॅक्शन प्लॅनचे पालन करा.
शक्य असल्यास घरात चांगल्या गुणवत्तेचा एअर प्युरिफायर वापरा. ज्यामुळे घरातील हवा शुद्ध राहील. दिवाळीत तेल किंवा तुपाचे दिवे वापरा. धूर करणारे अगरबत्ती किंवा धूप जाळणे टाळा.
फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाबद्दल आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांना माहिती द्या. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबद्दल इतरांना प्रोत्साहित करा. आपल्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.