Homemade Cerelac | घरी बनवलेले सेरेलॅक देताय? 
आरोग्य

Homemade Cerelac | घरी बनवलेले सेरेलॅक देताय?

पुढारी वृत्तसेवा

डॉ. दीपा अग्रवाल

बाळ सहा महिन्यांचे झाले की, पालक त्याला नवीन पदार्थांची चव चाखवू लागतात; मात्र सोशल मीडियावरील अर्धवट माहितीच्या आधारे घरीच बनवलेले सेरेलॅक किंवा नटस् पावडर बाळाच्या आरोग्यासाठी मोठी अडचण ठरू शकते.

मध्यंतरी माझ्याकडे एक सात महिन्यांचे बाळ आले होते. हे बाळ सतत चिडचिड करत होते आणि त्याला ‘लूज मोशन’चा त्रास होत होता. पालकांनी चौकशीअंती सांगितले की, ते बाळाला घरी बनवलेली नटस् पावडर देत आहेत. या पावडरमध्ये बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, मखाना, ओटस् आणि रागी या सर्वांचे मिश्रण होते. सात महिन्यांच्या बाळाच्या पचनसंस्थेचा (गट) विकास अद्याप पूर्ण झालेला नसतो. जेव्हा इतके जड पदार्थ एकाच वेळी दिले जातात, तेव्हा बाळाच्या नाजूक पोटाला ते पचवणे कठीण जाते आणि पचनक्रिया विस्कळीत होते.

बाळाला जेवण देण्याची योग्य पद्धत म्हणजे एक वेळी एकच पदार्थ. जेव्हा बाळ सहा महिन्यांचे होते, तेव्हा त्याला कोणताही नवीन पदार्थ देताना तो दोन ते तीन दिवस सतत द्यावा. या काळात बाळाला उलट्या, लूज मोशन किंवा चिडचिड असे कोणतेही लक्षण दिसत नसेल, तरच बाळ त्या पदार्थाशी कम्फर्टेबल आहे असे समजावे. साधारण चार ते पाच दिवसांच्या अंतरानेच दुसर्‍या नवीन पदार्थाची ओळख करून द्यावी.

लहान बाळाला सुका मेवा देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा एक किंवा दोन बदाम उगाळून त्याच्या अन्नात मिसळून द्यावेत. बाळाला सर्व प्रकारचे पदार्थ पचवण्याची सवय झाल्यावर म्हणजे बाळ आठ ते नऊ महिन्यांचे झाल्यावरच अशा मिश्र पावडरचा विचार करावा. सुरुवातीच्या काळात हेवी डाएट बाळासाठी पोषण देण्याऐवजी इन्फेक्शन किंवा इंडायजेशनचे कारण बनू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT