Organic products | सेंद्रिय उत्पादनांचे सेवन करताय? 
आरोग्य

Organic products | सेंद्रिय उत्पादनांचे सेवन करताय?

पुढारी वृत्तसेवा

सूर्यकांत पाठक

आजकाल बाजारपेठेत ‘ऑर्गेनिक’ किंवा सेंद्रिय उत्पादनांची मोठी लाट आली आहे. सामान्य अन्नाच्या तुलनेत हे पदार्थ अधिक शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात, या विश्वासाने ग्राहक ते खरेदी करतात.

दुकाने असोत किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, प्रत्येक ठिकाणी ‘ऑर्गेनिक’ नावाचा टॅग सर्रास वापरला जातो. मात्र, केवळ पाकिटावर लिहिले आहे म्हणून ते उत्पादन खरोखर सेंद्रिय असेलच असे नाही. अनेक कंपन्या केवळ मार्केटिंग आणि जास्तीचा नफा मिळवण्यासाठी या शब्दाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. एफएसएसएआयने याबाबत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी केवळ नावावर न जाता त्यावरील प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) आणि लेबलची बारकाईने तपासणी करणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

सेंद्रिय अन्न (ऑर्गेनिक फूड) म्हणजे असे पदार्थ ज्यांच्या उत्पादनात रासायनिक खते, कीटकनाशके, जनुकीय बदल केलेली तंत्रज्ञान (जीएमओ) किंवा कोणत्याही कृत्रिम घटकांचा वापर केला जात नाही. यामध्ये शेतीसाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला जातो, ज्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. याउलट, सामान्य अन्नामध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पीक लवकर येण्यासाठी रसायने आणि वाढीला चालना देणार्‍या घटकांचा वापर केला जातो.

खर्‍या सेंद्रिय उत्पादनाची ओळख कशी पटवावी?

बाजारात मिळणार्‍या उत्पादनांपैकी कोणते उत्पादन खरोखर सेंद्रिय आहे, हे ओळखण्यासाठी केवळ नावावर अवलंबून राहू नका. एफएसएसएआयने सुचवलेली खालील तीन महत्त्वाची चिन्हे पाकिटावर असणे आवश्यक आहे:

1. जैविक भारत लोगो

भारतातील सेंद्रिय उत्पादनांसाठी हे सर्वात महत्त्वाचे आणि अनिवार्य लेबल आहे.

2. इंडिया ऑर्गेनिक

हे एनपीओपी (नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन) अंतर्गत दिले जाणारे प्रमाणीकरण आहे.

3) पीजीएस-इंडिया ऑर्गेनिक

हे देखील सरकारमान्य सेंद्रिय प्रमाणीकरण असून ते उत्पादनाच्या विश्वासार्हतेची ग्वाही देते. उत्पादनावर ही चिन्हे असतील, तरच ते सरकारी मानकांनुसार सेंद्रिय असल्याचे मानले जाते.

फूड लेबल वाचताना घ्यायची काळजी

कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल वाचणे हे आरोग्याच्या द़ृष्टीने हितकारक ठरते. लेबल तपासताना खालील बाबींकडे लक्ष द्यावे. पाकिटावर अधिकृत आणि मान्यताप्राप्त लोगो असल्याची खात्री करा. उत्पादनातील घटकांची यादी जितकी छोटी आणि समजायला सोपी असेल, तितके ते उत्पादन चांगले मानले जाते. अनावश्यक रसायने, रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्हज नसलेले पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा. सेंद्रिय पदार्थ नैसर्गिक असल्याने ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची मुदत नक्की तपासा.

सावधगिरीचे इशारे

काही उत्पादनांवर ‘नॅचरल’ किंवा ‘फार्म फ्रेश’ असे शब्द वापरले जातात; पण त्यावर कोणतेही अधिकृत प्रमाणीकरण नसते. अशा केवळ शब्दांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. पुराव्याशिवाय केलेले मोठे दावे हे फसवणुकीचे लक्षण असू शकतात. आपली आरोग्य सुरक्षा आपल्याच हातात असल्याने योग्य माहिती घेऊनच उत्पादने खरेदी करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT