वजन हे केवळ एक लक्षणीय मापक आहे; पण ते आरोग्याचं एकमेव परिमाण नाही. शरीरयष्टी, वय, लिंग, क्रियाशीलता, स्नायूंचं प्रमाण, पाणी प्रमाण आणि हॉर्मोनल चक्र यावर त्याचा प्रभाव असतो.
वजन हे आजच्या काळातील आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अत्यंत केंद्रस्थानी असलेला विषय. आहारातील बदल, बैठी जीवनशैली, मानसिक तणाव आणि आजारांचे वाढते प्रमाण यामुळे आज 30 ते 60 या वयोगटातील असंख्य जण ग्रासलेले दिसतात. भारतात लठ्ठपणाचं प्रमाणही प्रचंड वाढलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 नुसार भारतात 18 वर्षांवरील 24 टक्के पुरुष आणि 23 टक्के महिला लठ्ठपणाच्या श्रेणीत येतात. महाराष्ट्रात हे प्रमाण यापेक्षा अधिक असून शहरांमध्ये विशेषतः तीव्रतेने जाणवत आहे. दुसरीकडे, सोशल मीडियामुळे नागरिक वजनाबाबत अधिक सजग झाले आहेत. घराघरात डिजिटल वजनकाटे दिसून येतात; परंतु वजन तपासताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
वजन सकाळी, प्रातःविधीनंतर आणि उपाशीपोटीच तपासावं. रात्रीच्या झोपेनंतर शरीर एका वेगळ्या स्थितीत असते. यामुळे मोजमाप तुलनेने अचूक येत नाही.
वजन घेताना शक्यतो हलके कपडे परिधान केलेले असावेत. दरवेळी बदलत्या पोशाखामुळे वजनात कृत्रिम फरक दिसू शकतो.
वजनकाटा सपाट जमिनीवर ठेवावा. मऊ गाद्या किंवा चटईवर ठेवला असता चुकीचं वजन दाखवतो.
कमी दर्जाचे किंवा कमी किमतीचे डिजिटल वजनकाटे वारंवार त्रुटी दर्शवतात. शक्य असल्यास आयएसओ प्रमाणित किंवा बीआयएस प्रमाणित काटे वापरावेत.
वजन आठवड्यातून एकदाच तपासा. रोज वजन तपासल्यास नैराश्य, गोंधळ किंवा चुकीचे निष्कर्ष निघू शकतात. वजन हे एकाच दिवशी बदलणारे मापक नाही.
व्यायामानंतर लगेच वजन करू नये. कारण, घामाने शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे क्षणिक वजन घटलेलं वाटतं.
वीकेंडला खाण्याचं प्रमाण, विश्रांतीचा अभाव यामुळे शरीरात पाणी साठतं. अशा वेळीही वजन करू नये. महिलांनी मासिक पाळीदरम्यान वजन करणे टाळावे.
याखेरीज, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, जास्त मिठाचा आहार घेतला असेल, तर वजनात वाढ दिसू शकते; पण ती बरेचदा तत्कालिक राहते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वजन हे केवळ एक लक्षणीय मापक आहे; पण ते आरोग्याचं एकमेव परिमाण नाही. शरीरयष्टी, वय, लिंग, क्रियाशीलता, स्नायूंचं प्रमाण, पाणी प्रमाण आणि हॉर्मोनल चक्र यावर त्याचा प्रभाव असतो. वजन कमी-जास्त होतं म्हणजे आपण आजारी आहोत असं नाही आणि स्थिर राहिलं म्हणजे सर्व काही सुरळीत आहे, असंही नाही.