मंजिरी फडके
सकाळी भरपेट नाश्ता केला, तरी तासाभराने काहीतरी खावेसे वाटते. दुपारचे जेवण झाल्यानंतरही संध्याकाळच्या आधीच भुकेची जाणीव होते. काही जणांना तर दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने खाण्याची इच्छा होत राहते. अधूनमधून असे होणे स्वाभाविक आहे; मात्र पुरेसे जेवूनही सतत भूक लागत असेल, तर आपण किती खातो यापेक्षा काय खातो, किती झोपतो आणि दिवसभरातील आपली दिनचर्या कशी आहे, हे पाहणे गरजेचे ठरते.
जेवल्यानंतर काही तासांनी भूक लागणे ही शरीराची स्वाभाविक प्रक्रिया आहे; मात्र पोटभर जेवल्यानंतरही सतत काहीतरी खावेसे वाटणे, दिवसभर वारंवार खाण्याची इच्छा होणे किंवा नेहमीपेक्षा अचानक भूक वाढणे यामागे केवळ कमी खाणे हेच कारण असेल असे नाही. आहाराची रचना, अपुरी झोप, शरीरातील पाण्याची कमतरता, तणाव आणि काही आजारही भूक वाढवू शकतात.
जेवण पोटभर, तरी समाधान नाही?
जेवणात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ कमी असतील, तर पोट भरल्याची भावना फार काळ टिकत नाही. पांढरा ब्रेड, मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, मिठाई किंवा इतर रिफाईंड कार्बोहायड्रेट्सवर भर असल्यास काही वेळात पुन्हा भूक लागू शकते. डाळी, कडधान्ये, अंडी, पनीर, दही, भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि सुका मेवा यांचा योग्य समावेश केल्यास जेवण अधिक संतुलित होते आणि तृप्ती अधिक काळ टिकण्यास मदत होते.
झोप आणि भूक यांचाही जवळचा संबंध आहे. नियमितपणे अपुरी झोप घेतल्यास भूक नियंत्रित करणार्या शरीरातील प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी दिवसभर अधिक खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते आणि विशेषतः जास्त उष्मांक असलेल्या पदार्थांकडे ओढ वाढू शकते.
तहान की भूक?
काही वेळा शरीराला पाण्याची गरज असताना आपल्याला भूक लागल्यासारखे वाटू शकते. विशेषतः उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर असे घडण्याची शक्यता असते. दोन जेवणांच्या मध्ये अचानक काहीतरी खावेसे वाटल्यास थोडे पाणी पिऊन काही वेळ थांबता येईल; मात्र खरी भूक लागली असेल, तर केवळ पाणी पिऊन ती दाबणे योग्य नाही.
तणावाचाही खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो. मानसिक ताण, चिंता, कंटाळा किंवा भावनिक अस्वस्थतेच्या काळात प्रत्यक्ष भूक नसतानाही खाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, व्यायाम किंवा शारीरिक श्रम वाढले असतील आणि त्या प्रमाणात आहारातून ऊर्जा मिळत नसेल, तर वारंवार लागणारी भूक ही शरीराची खरी गरज असू शकते.
वाढलेली भूक कधी गंभीर?
सतत आणि असामान्य प्रमाणात भूक लागण्यामागे मधुमेह किंवा अतिसक्रिय थायरॉईडसारखी वैद्यकीय कारणेही असू शकतात. काही औषधांमुळेही भूक वाढू शकते. वाढलेल्या भुकेसोबत कारण नसताना वजन कमी होणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, धडधड, जास्त घाम येणे किंवा हात थरथरणे अशी लक्षणे दिसत असतील, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे सततची भूक ही केवळ खाण्याची सवय समजून दुर्लक्ष करण्यापेक्षा तिच्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे ठरते.