डॉ. साईनाथ पोवार
सुधाला काही वर्षांपासून अॅलर्जिक सर्दी व दम्याचा त्रास होता. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले व नुकतीच गरोदर असल्याची बातमी मिळाली. नक्कीच ही बातमी आनंदाचीच होती. परंतु, सुधाच्या मनात थोडी भीती ही होती ती म्हणजे तिला असणार्या अॅलर्जीची.
या अॅलर्जीचा प्रेग्नन्सीमध्ये त्रास होईल काय? प्रेग्नन्सीमुळे अॅलर्जी-अस्मथा वाढेल काय? आणि जर त्रास झाला तर कोणती औषधे माझ्यासाठी योग्य आहेत जेणेकरून पोटातील बाळावर त्याचा परिणाम होणार नाही. माझ्या अॅलर्जी अस्थमाचा बाळावर काय परिणाम होईल?
माझ्या होणार्या बाळाला माझ्यासारखा अॅलर्जीचा त्रास होईल का? अॅलर्जी व अस्थमा असणार्या व आई बनण्यास इच्छुक असणार्या अनेकांच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न इथे करू.
अॅलर्जी व अस्थमा हा आताच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आजार आहे व त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत अॅलर्जी व अस्थमाचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी, प्रदूषण यामुळे अॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे.
अॅलर्जी हा शरीराच्या इम्युनिटीच्या अॅबनॉर्मल रिस्पॉन्स आहे. सततची सर्दी, शिंका येणे (अॅलर्जीक शइनाईटीस) वारंवार येणारा जास्त दिवस राहणारा खोकला, धाप लागणे, छातीत शिटीसारखा आवाज येणे, छातीत घरघर होणे (अस्थमा), त्वचेवर गांध्या, पित्त चट्टे उठणे व चेहरा सुजणे (स्कीन अॅलर्जी) व फूड अॅलर्जी ही अॅलर्जीची लक्षणे आहेत. यामध्ये अॅलर्जीची सर्दी व अस्थमा हे दोन आजार जास्त प्रमाणात असतात व जास्त महत्त्वाचे आहेत.
साधारण 20 टक्के गर्भवती मातांमध्ये अॅलर्जीचा त्रास दिसतो. यातील 30 टक्के मातांमध्ये (गर्भवती) अॅलर्जी व अस्थमाचा त्रास वाढताना दिसतो. 30 टक्के प्रेग्नन्सी मातांमध्ये त्रास मी होताना दिसतो व 30 टक्केमध्ये अॅलर्जी अस्थमा आहे तसाच राहतो.
बर्याच वेळा प्रेग्नन्सी चालू झाल्यानंतर नेहमीची चालू असतानाची अस्थमाच्या औषधांचा बाळावर परिणाम होईल, असे वाटल्यामुळे ती औषधे बंद केली जातात. व त्यामुळे अस्थमाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशी ट्रिटमेंट बंद न करता त्यामध्ये योग्य बदल करून ती चालू ठेवणे गरजेचे आहे.
अस्थमाचा प्रेग्नन्सीवर परिणाम
प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे श्वासनलिका नाजूक झालेली असते. त्यामुळे त्रास होऊ शकतो.
कोणत्याही स्ट्रेसमुळे अस्थमा वाढू शकतो.
अस्थमामुळे गर्भवतीच्या बाळावर होणारे परिणाम
जर प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईला अस्थमाचा अटॅक आला व त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर त्याचा बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो.
आईच्या Unvontrolled Asthma मुळे बाळ गुदमरणे, कमी वजनाचे व कमी दिवसांचे बाळ जन्माला येणे, बाळाची वाढ खुंटणे त्याचप्रमाणे काही औषधांमुळे बाळांमध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. अशी औषधे टाळणे गरजेचे आहे.
जर आईचा अस्थमा Well controlled (आटोक्यात) नसेल तर आई व बाळ दोघांना 15-20 टक्के धोका वाढतो व अस्थमा जास्त प्रमाणात असेल तर हा धोका आणखी वाढू शकतो. त्यामुळे त्याची योग्य ट्रिटमेंट होणे आवश्यक आहे. अस्थमामुळे बाळामध्ये कोणतेही व्यंग निर्माण होत नाही. परंतु, काही चुकीच्या औषधांमुळे ती शक्यता असते. (अशा प्रकारचे औषधे टाळणे गरजेचे आहे.)
प्रेग्नन्सीमध्ये अॅलर्जी अस्थमाचे निदान
प्रेग्नन्सीमध्ये अॅलर्जीच्या निदानांसाठी अॅलर्जीक स्कीन प्रिक टेस्ट करणे टाळावे.
अत्यंत गरज असल्यास (Blood) रक्ताच्या टेस्ट करू शकतो. परंतु, प्रेग्नन्सीमध्ये फक्त त्रास असेल त्यानुसार उपचार करणे योग्य. अस्थमाच्या पेशंटसाठी प्रेग्नन्सीमध्ये स्पायटोमेट्रीची टेस्ट केली जाऊ शकते. यामध्ये अस्थमाचे प्रमाण किती आहे? श्वासनलिकेची सूज, फुफ्फुसाची क्षमता या सर्व गोष्टी कळतात.
अॅलर्जीच्या निदानासाठी अॅलर्जीक स्किन प्रिक टेस्ट ही गोल्ड स्टॅडर्ड टेस्ट आहे; परंतु ही टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये करता येत नाही.
त्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये फूड अॅलर्जी निदानासाठी फूड चॅलेंज टेस्ट व अॅलर्जीक पॅच टेस्ट यासुद्धा करू नयेत.
अॅलर्जी व अस्थमाचा प्रेग्नन्सीमधील उपचार
अॅलर्जीच्या पेशंटला प्रेग्नन्सीदरम्यान जागरूक राहणे गरजेचे आहे व जेणेकरून अॅलर्जी व अस्थमाचा त्रास वाढू नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आईला होणार्या प्रत्येक त्रासाचा परिणाम पोटातील बाळावर होऊ शकतो.
प्रेग्नन्सीदरम्यान आईच्या फुफ्फुसाची क्षमता (Pulmnory fuction) चांगली ठेवणे आवश्यक आहे. ज्यामध्ये आईच्या हालचालीस बंधणे राहणार नाहीत.
आईने योग्य ती औषधे वेळवर घेणे गरजेचे आहे.
आईने अॅलर्जी व अस्थमाचा त्रास वाढवणार्या गोष्टींपासून लांब राहावे.
उदा ः- धूर, धूम्रपान (Active or passive smoking) परफ्यूम, धूळ, बुरशी, हवेतील परागकण (Pollens) पाळीव प्राणी, झुरळे या सर्व गोष्टींना टाळणे आवश्यक आहे.
प्रेग्नन्सीमध्ये योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने अस्थमासाठी योग्य प्रकारचे इनहेलर्स (MOI) घेणे योग्य आहे. जेणेकरून प्रेग्नन्सीमध्ये त्रास कमी होईल.
प्रेग्नन्सीमध्ये अस्थमासाठी वापरल्या जाणार्या औषधांना category A, B, C, D व x यामध्ये विभागले आहे. त्यामध्ये A म्हणजे सर्वात सेल औषधे व x म्हणजे unsafe औषधे पेशंटला होणार्या त्रासानुसार category B, C, D मधील औषधे वापरली जातात.
प्रेग्नन्सीमध्ये नवीन इम्युनोथेरपी (इम्युनोथेरपी म्हणजे अॅलर्जी मुळापासून बरी करावयाची ट्रिटमेंट) चालू करता येत नाही. परंतु, ज्यांची आधीपासून इम्युनोथेरपी चालू आहे. त्यांना चालू ठेवण्यास काहीही अडचण नसते.
अॅलर्जी अस्थमाचा स्तनपानावर (Breast Feeding) कोणताही परिणाम होत नाही किंवा अस्थमाच्या औषधांचा (इनहेलर्स व इतर औषधे) स्तनपानामुळे बाळावर परिणाम होत नाही. त्यामुळे आईची योग्य औषधे चालू ठेवणे व बाळाला स्तनपान करणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
अॅलर्जी, अस्थमामधील अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सर्व गरोदर मातांकडून विचारला जातो. तो म्हणजे माझी अॅलर्जी किंवा अस्थमा माझ्या बाळाला अनुवंशिकतेने जाईल का? याचे उत्तर असे आहे की, आईकडून बाळाला अनुवंशिकतेने अॅलर्जी अस्थमा जाऊ शकतो व त्याचे प्रमाण 30 टक्के ते 50 टक्के असू शकते व हे प्रमाण कमी करण्यास इम्युनोथेरपीचा उपयोग होऊ शकतो, कारण इम्युनोथेरपी ही गुणसूत्राच्या पातळीवर जाऊन अॅलर्जी कमी करते. (यावर बराच अभ्यास (रिसर्च) चालू आहे)
सर्वात योग्य उपचार पद्धती म्हणजे-
प्रेग्नन्सीच्या आधीच जर आपण योग्यप्रकारे उपचार केले तर प्रेग्नन्सीमध्ये आई व बाळ यांचा त्रास आपण वाचवू शकतो. प्रेग्नन्सीला इच्छुक महिलांनी अस्थमा पूर्ण आटोक्यात ठेवणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीच्या आधीच त्यांनी अॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट करून नक्की कोणती अॅलर्जी आहे त्याची खात्री करून, आपण त्या वस्तू टाळू शकतो व टाळणे शक्य नसल्यास आपण त्या अॅलर्जीची ट्रिटमेंट म्हणजेच इम्युनोथेरपी करू शकतो. अॅलर्जी स्क्रिन प्रिक टेस्ट ही वेदनारहीत व रक्तस्त्राव विरहित (Bloodless) असते.
इम्युनोथेरपी ही अॅलर्जी मुळापासून बरी करण्याची ट्रिटमेंट आहे. ही आधुनिक शास्त्रोक्त व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झालेली उपचारपद्धती आहे.
ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) या जागतिक संघटनेने इम्युनोथेरपीला मान्यता दिलेली आहे. या उपचाराने शरीरातील अॅलर्जी कमी होत जाते व अॅलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते व त्यामुळे अॅलर्जीमुळे होणारा अस्थमाचा त्रास कमी होतो.
ही उपचारपद्धती अॅलर्जीची सर्दी, अॅलर्जीमुळे होणारे पित्त, स्किन अॅलर्जी, डोळ्याची अॅलर्जी कमी होत जाते व अॅलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते व त्यामुळे अॅलर्जीमुळे होणारा अस्थमाचा त्रास कमी होतो.
ही उपचारपद्धती अॅलर्जीची सर्दी, अॅलर्जीमुळे होणारे पित्त, स्किन अॅलर्जी, डोळ्यांची अॅलर्जी यासाठी सुद्धा केली जाते.
अॅलर्जीच्या इतर सर्व ट्रिटमेंटचा फायदा हा ट्रिटमेंट चालू असेपर्यंतच असतो; पण इम्युनोथेरपीचा फायदा हा दीर्घकाळासाठी राहतो. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपीमुळे नवीन अॅलर्जी येण्याचे प्रमाण कमी होते.
WHO position paper नुसार इम्युनोथेरपी ही अॅलर्जी मुळापासून बरी करण्याची एकमेव ट्रिटमेंट आहे व अॅलर्जीच्या प्रत्येक पेशंटला इम्युनोथेरपीचा पर्याय देणे आवश्यक आहे.
इम्युनोथेरपी ही गुणसुत्राच्या पातळीवर काम करते व त्यामुळे आईचा त्रास कमी होतोच; परंतु अॅलर्जी अनुवंशिकतेने बाळाला जाण्याचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. अशाप्रकारे इम्युनोथेरपीचा अप्रत्यक्ष फायदा होणार्या बाळाला होऊ शकतो.
अशाप्रकारे प्रेग्नन्सीपूर्व व प्रेग्नन्सीदरम्यान अॅलर्जी अस्थमामुळे घाबरून न जाता आपण योग्य ट्रिटमेंट करून आपण प्रेग्नन्सीचा काळ आनंदमय करू शकतो.
(उत्तरार्ध)