Mental Stress | अस्वस्थ मनाचा इशारा 
आरोग्य

Mental Stress | अस्वस्थ मनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संतोष काळे

डिप्रेशन, अँक्झायटी, अ‍ॅलेक्सिथायमिया की बर्नआऊट अशी मनाची अवस्था, तसेच मनातील भावना ओळखता न येणे, सतत चिडचिड होणे आणि आयुष्यातील आनंद हरवणे ही मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.

अनेकदा शरीर निरोगी असते. दैनंदिन कामे सुरळीत सुरू असतात. आयुष्यात एखादी मोठी समस्याही नसते, तरीही मन प्रसन्न नसते. सतत थकवा जाणवतो, किरकोळ कारणांवरून चिडचिड होते, माणसांमध्ये मिसळण्याची इच्छा होत नाही. पूर्वी आनंद देणार्‍या गोष्टींमध्येही रस उरत नाही. विशेष म्हणजे, आपल्याला नेमके काय होत आहे, हे स्वतःलाच समजत नाही. मानसशास्त्रात अशा अनुभवांशी संबंधित काही विशिष्ट संकल्पना आहेत. या बदलांमागे नैराश्य, चिंताविकार, भावनिक थकवा किंवा भावना ओळखण्यातील अडचणी असू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

अ‍ॅलेक्सिथायमिया : भावना ओळखण्यातील अडचण

आपल्याला आनंद, दुःख, राग किंवा भीती यांपैकी नेमकी कोणती भावना जाणवत आहे, हे काही व्यक्तींना स्पष्टपणे सांगता येत नाही. मानसशास्त्रात या वैशिष्ट्याला ‘अ‍ॅलेक्सिथायमिया’ म्हणतात. हा स्वतंत्र मानसिक आजार मानला जात नाही. मात्र, स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांचे वर्णन करणे आणि त्या इतरांसमोर व्यक्त करणे यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये हे वैशिष्ट्य नैराश्य किंवा चिंताविकारासोबत आढळू शकते.

अँक्झायटी डिसऑर्डर : कारण नसतानाही चिंता

भविष्याची सतत काळजी वाटणे, मनात नकारात्मक विचार येणे, अस्वस्थता, स्नायूंमध्ये ताण आणि झोपेच्या तक्रारी ही चिंताविकाराची संभाव्य लक्षणे आहेत. ’जनरलाईज्ड अँक्झायटी डिसऑर्डर’ या विकारामध्ये अनेक दैनंदिन गोष्टींबद्दल अतिप्रमाणात चिंता निर्माण होते आणि ती नियंत्रित करणे कठीण जाते. मात्र, प्रत्येक प्रकारची चिंता म्हणजे चिंताविकार नसतो.

बर्नआऊट : भावनिक आणि मानसिक थकवा

सततच्या कामाच्या ताणामुळे निर्माण होणार्‍या अवस्थेला ‘बर्नआऊट’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्नआऊट ही दीर्घकाळ योग्यप्रकारे हाताळला न गेलेल्या कामाशी संबंधित तणावातून निर्माण होणारी अवस्था आहे. स्वतंत्र वैद्यकीय आजार नाही. प्रचंड थकवा, कामापासून मानसिक दुरावा आणि कार्यक्षमतेत घट ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

लक्षणे किती दिवस टिकतात?

एखाद-दुसरा दिवस उदास वाटणे किंवा चिडचिड होणे स्वाभाविक आहे. मात्र, अशी लक्षणे दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहिल्यास विशेषतः दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. नैराश्याचे निदान करताना लक्षणांचा कालावधी, तीव्रता आणि इतर वैद्यकीय कारणांचाही विचार केला जातो.

भावनांना दडपण्याऐवजी समजून घ्या

मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय शोधण्यापूर्वी स्वतःच्या भावनिक स्थितीची जाणीव होणे महत्त्वाचे आहे. मनातील अस्वस्थतेचे कारण लगेच समजले नाही, तरी स्वतःच्या वागणुकीतील बदलांची दखल घ्यावी. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची मदत घ्यावी. योग्य मूल्यमापन, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार उपचार यांमुळे मानसिक आरोग्यात सुधारणा होऊ शकते. स्वतःच्या मनातील बदल ओळखणे ही मानसिक आरोग्य जपण्याची पहिली पायरी आहे.

अ‍ॅन्हेडोनिया : आनंद हरवण्याची अवस्था

पूर्वी आवडणारे छंद, संगीत, प्रवास किंवा मित्रांच्या भेटी अचानक निरर्थक वाटू लागणे, याला ‘अ‍ॅन्हेडोनिया’ म्हणतात. आनंद अनुभवण्याची क्षमता कमी होणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर म्हणजेच गंभीर नैराश्याच्या विकारातील महत्त्वाचे लक्षण असू शकते. सतत उदास वाटणे, झोप आणि भुकेमध्ये बदल होणे, एकाग्रता कमी होणे यांसारखी इतर लक्षणेही त्यासोबत दिसू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT