पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. १४ रोजी एनआयव्ही या संस्थेने पाठवलेल्या अहवालमध्ये संबधीत डॉक्टर हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात म्हटले आहे, याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी आर. डी. शिंदे यांनी दिली. यामुळे शिक्रापूर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अधिक वाचा : भवानी पेठ पुण्याचे हॉट स्पॉट
यानंतर तातडीने शिक्रापूर तळेगाव रस्त्यावरील रहिवासी व व्यावसायिक क्षेत्र सील करण्यात आले आहे. या डायग्नोसीस सेंटरच्या डॉक्टर व स्टाफच्या संपर्कात आलेल्या सुमारे १४४ व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु केली आहे. शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटर असलेल्या ठिकाणी पाहणी करून प्रशासनाने परिसरात फवारणी केली. सोनोग्राफी सेंटरदेखील बंद केले आहे. सोनोग्राफी सेंटरमध्ये कामाला असलेल्या आठ कर्मचाऱ्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत; परंतु सोनोग्राफी सेंटर चालक व करोना बाधित डॉक्टरने चार दिवसांत तब्बल दीडशे रुग्णांची सोनोग्राफी केलेली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : गल्लीबोळ बंद करून झोपडपट्ट्यांत अवैध धंदे
डॉक्टरांना शारीरिक त्रास होऊ लागल्याने आणि त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी प्रथम पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले आणि तेथे डॉक्टरच्या करोना बाबतच्या तपासण्या करण्यात आल्या असता करोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पुन्हा नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली असताना त्यामध्ये देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : लॉक डाऊनमध्ये गांजासाठी अशी ही बनवाबनवी
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद, तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके, बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सरपंच जयश्री भुजबळ यांसह आदींनी तातडीने शिक्रापूरमध्ये कडक अंमलबजावणीला सुरुवात केली.
अधिक वाचा : पुण्यातील बावीस भाग सील होणार
आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून विशेष काळजी घेत या परिसरामध्ये नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर गावाला जोडणारे सर्व बाजूचे रस्ते पूर्णपणे बंद करून गावच संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
अधिक वाचा : राज्यातील दहा जिल्ह्यांच्या सीमा सील करून उद्योग धंदे सुरू करण्याचा विचार
शिक्रापूर येथील तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून याठिकाणी सोनोग्राफीसाठी आलेल्या १४४ नागरिकांची दररोज तपासणी करत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
शिक्रापूर येथील डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार श्रीशैला व्हट्टे, तलाठी अविनाश जाधव यांनी शिक्रापूर गावाला भेट दिली. आरोग्य विभागाला या सोनोग्राफी सेंटरमध्ये आलेल्या १४४ लोकांची नावे व पत्ते शोधून त्यांना योग्य माहिती देत, काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आहेत.