अंकुर

कथा : नोकर राजा | पुढारी

Pudhari News

आफ्रिकेतील कमेरा देशाचा राजा फार हट्टी व घमेंडी होता. त्याची प्रजा त्याला फार घाबरून असायची. एके दिवशी मातीच्या राजवाड्यात इतर दरबार्‍यांबरोबर राजा बसलेला होता. मागण्या व विनंत्या करणार्‍यांची रीघ लागली होती. एवढ्यात राजाला काय लहर आली कुणास ठाऊक. तो सिंहासनावरून उठून उभा राहिला व त्याने जाहीर केले, की तो अलम दुनियेचा मालक आहे व जगातील सर्व लोक त्याचे नोकर आहेत.

"राजा, तू चुकत आहेस. सर्व लोक एकमेकांचे नोकर आहेत."

दरबारात स्मशानशांतता पसरली. तेथे जमलेल्या लोकांचे रक्‍त नसांमध्ये थिजले. राजा रागावून ओरडला. 

"हे कोण बोललं? कोणाची हिंमत झाली मला नोकर म्हणायची?"

"मी म्हणालो." गर्दीतून एक कृश म्हातारा काठी टेकत पुढे येत बोलला. डोक्यावरचे सर्व केस पांढरा झालेला तो म्हातारा फार गरीब दिसत होता.

"कोण आहेस तू?" राजाने छद्मीपणे विचारले.

"माझे नाव बौबाकर आहे. आमच्या गावात दुष्काळ पडला आहे. पिण्यास पाण्याचा थेंबही नाही. तेथे एक विहीर खोदण्याची विनंती करण्यासाठी मी तुमच्या दरबारात आलो आहे."

"म्हणजे तू भिकारी आहेस तर!" राजाच्या स्वरात तुच्छता होती. "तरीही मला नोकर म्हणायचे साहस तुला कसे झाले?"

"आपण सर्व एकमेकांचे नोकरच आहोत." बौबाकर न घाबरता शांतपणे उत्तरला. "माझे म्हणणे सत्य असल्याचे मी लगेच येथे सिद्ध करू शकतो."

"मग वेळ कशाला घालवतोस, लगेच सिद्ध कर!" राजा म्हणाला, "जर तू खरा ठरलास तर एक काय तीन विहिरी मी तुझ्या गावात खोदेन. जर तू खोटा ठरलास मात्र तुझे शीर तुझ्या धडावर राहणार नाही."

"आमच्या गावात एखाद्या व्यक्‍तीचे आव्हान स्वीकारायचे ठरवले, की त्या व्यक्‍तीचे पाय पकडण्याची पद्धत आहे. माझी काठी जरा पकडशील का?" 

राजाने म्हातार्‍याची काठी पकडली. म्हातार्‍याने वाकून राजाच्या चरणाला स्पर्श केला.

"आता माझी काठी मला परत दे." म्हातारा पुन्हा सरळ उभा राहत म्हणाला. राजाने त्याची काठी परत केली. 

बौबाकरने राजाला विचारले, "तुला आणखी काही पुरावा हवा काय राजा." 

"कसला पुरावा?" राजाने आश्चर्यचकित होत विचारले.

"जेव्हा मी तुला माझी काठी पकडायला सांगितली तेव्हा तू ती पकडलीस. जेव्हा काठी परत करायला सांगितली तेव्हा तू ती परत केलीस. सर्व चांगली माणसे एकमेकांची नोकर असतात, याबद्दल आणखी कोणता पुरावा तुला हवा?" राजाच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. तो बौबाकरवर फार प्रसन्न झाला. त्याने बौबाकरच्या गावात तीन विहिरी खोदण्याचा आदेश दिला. शिवाय त्याला सल्लागार म्हणूनही नेमले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT