वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने नारळ हे तीनही म्हणजे फळ, नट आणि बीदेखील आहे. नारळाचा इतिहास फार जुना असून, उत्तर आशियात तो अनेक गोष्टीसाठी वापरला जातो. धार्मिक दृष्टीनेच त्याचे महत्त्व आहे. नारळ हे अतिशय प्राचीन झाड आहे, असा शास्त्रज्ञांचा विश्वास असून, ते न्यू ग्वेनिया येथून आले आहे. नंतरच्या काळात प्रवासी नाविकांद्वारे त्याचा प्रवास झाला आणि नंतर नारळाचा वापर बी म्हणून तसेच फळ म्हणून करण्यात येऊ लागला. वास्को-द- गामाच्या जहाजावरील नाविकांनी नारळाला 'कोकोनट' हे नाव दिले. ते याला सुरुवातीला 'कोको' म्हणायचे. चॉकलेटी, केसाळ शेंड्या, मानवी चेहऱ्याप्रमाणे तीन खड्डे असल्यामुळे ते चैतन्याचे प्रतीक मानले जाऊ लागले.
'कोको' ज्यावेळी इंग्लंडला पोहोचले, त्यातील नटचे गुणधर्म समोर आले आणि त्यानंतर त्याला 'कोकोनट' असे नाव पडले. अनेक पामवृक्षांप्रमाणे नारळाचे झाडदेखील बहुपयोगी आहे. झाडाची पाने विणकामासाठी, चटया बनवण्यासाठी किवा कापडी सतरंज्या बनवण्यासाठी वापरली जातात. बास्केट आणि इतर अनेक वस्तूही यापासून बनवतात. नारळ अन्न म्हणून, त्यातील पाणी पिण्यासाठी तसेच खोबऱ्याचा उपयोग तेल काढण्यासाठी तसेच औषध म्हणून वापरतात. त्याच्या झावळ्यांपासून दोरखंड आणि मॅटस् बनवल्या जातात. त्याचे लाकूड घरे आणि बोट बांधणीसाठी उपयोगात येते.