अंकुर

स्वर्ग आणि नरक | पुढारी

Pudhari News

अमनला स्वर्ग व नरक पाहण्याची तीव्र इच्छा होती. मेल्याशिवाय हे कसे शक्य होणार? एके दिवशी अमन मरण पावला. तो स्वर्ग आणि नरकाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचला. तेथे एक देवदूत त्याची वाटच पाहत होता. आयुष्यभर स्वर्ग व नरकाविषयी केवळ कल्पना करणार्‍या अमनला राहवले नाही. त्याने देवदूताला हात जोडून विनंती केली, "मला स्वर्गात न्या किंवा नरकात टाका; पण स्वर्ग व नरकाचे दर्शन आधी घडवा."

देवदूताने त्याची विनंती मान्य केली. त्याने अमनच्या हाताला धरून नरकात नेले. नरक अमनच्या कल्पनेपेक्षा वेगळा होता. तेथे एक प्रशस्त व लांबलचक मेज होते. मेजावर उत्तमोत्तम पक्‍वान्‍ने सजवून ठेवली होती. मेजाच्या सभोवताली लोक बसले होते. लोकांच्या डोक्यावर एक फलक होता. त्या फलकावर सूचना होती. 'अन्‍न केवळ मेजावरच्या चमचे व काट्यांद्वारे खायचे. अन्‍नाला हाताचा स्पर्श अजिबात करायचा नाही.'

चमचे व काटे एवढे मोठे होते की त्यांच्याद्वारे अन्‍नग्रहण करणे शक्यच नव्हते. तोंडाजवळ नेण्याअगोदरच अन्‍न खाली सांडायचे. त्यामुळे मेजाभोवती बसलेले लोक उपाशी व दु:खी दिसत होते.

"हा नरक आहे." देवदूत अमनला म्हणाला, "आता तुला स्वर्ग दाखवतो." देवदूत अमनला घेऊन स्वर्गात गेला. तेथे सर्व काही नरकासारखेच होते. लांबलचक व प्रशस्त मेज… उंची पक्‍वान्‍ने… आजूबाजूला बसलेले लोक… लांबलचक काटे व चमचे. तरीही लोक आनंदी व तृप्‍त दिसत होते. कारण लांबलचक काट्या-चमच्यांचा वापर लोक स्वत:च्या भोजनासाठी करत नव्हते, तर दुसर्‍यांना अन्‍न भरवण्यासाठी करत होते. त्यामुळे सर्वांना भरपेट अन्‍न मिळत होते. कोणी उपाशी व दु:खी नव्हते."हा स्वर्ग आहे." देवदूत म्हणाला.खरं म्हणजे देवदूताने सांगण्याची गरज नव्हती. अमनला स्वर्ग म्हणजे काय व नरक म्हणजे काय याची पुरती जाणीव झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT