बंगळुरूच्या एका उपनगरात राहणारी दोन जुळी भावंडे गगन व भूमिका मूर्ती आपल्या वडिलांसमवेत मडिवाला भाजी बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांचे वडील बाजारात खरेदी करत होते तर ही दोन भावंडे मोटारीमध्ये बसून बाजारातील लोकांची ये जा पाहत होते. एवढ्यात बाजारातील दोन मोकाट बैलांत झुंज लागली. लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. त्या दोन बैलांच्या जवळच एक लहान मुलगी धावताना खाली पडल्याचे या भावंडांनी पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता दोघांनी मोटारीतून खाली उतरून त्या मुलीच्या दिशेने धाव घेतली व त्या मुलीला रस्त्यावरून बाजूला केले. जर त्यांनी थोडासा उशीर केला असता तर ती मुलगी त्या बैलांच्या खुराखाली चिरडली गेली असती. गगन व भूमिकाच्या या साहसाबद्दल दोघांनाही केंद्र सरकारने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवले.