लडाखमधील लेहपासून जवळ असलेली मॅग्नेटीक हिल किंवा चुंबकीय टेकडी निसर्गाचा एक चमत्कार मानली जाते. या टेकडीत प्रचंड चुंबकीय आकर्षण आहे आणि त्यामुळे गाड्या या टेकडीवर खेचल्या जाऊन आपोआप वरती जातात तसेच या क्षेत्रावर उडणार्या विमानांनाही खेचले जाण्याच्या भीतीने आणखी उंचावरून उडावे लागते, अशा समजुती आहेत. खरे पाहता या चुकीच्या समजुती आहेत. विविध वस्तू या टेकडीवर आपोआप चढताना लोकांना दिसतात हा खरे तर द़ृष्टीभ्रम आहे. वास्तविक या टेकडीच्या विशिष्ट मांडणीमुळे असा द़ृष्टीभ्रम होतो.
या टेकडीभोवतीच्या परिसराची नैसर्गिक मांडणी अशी आहे की या टेकडीवरील किंचित खाली येणारा उतार हा चढ आहे असे भासते. हा द़ृष्टीभ्रम आहे. यामुळे गिअर नसलेली गाडी वरती चढते आहे असे वाटते. आहे की नाही गंमत?
अशा प्रकारच्या गुरूत्व टेकड्या जगभरात विविध ठिकाणी आहेत. अशा टेकड्यांवरील उतार हा द़ृष्टीभ्रम असतो. असा भ्रम निर्माण होण्यामागे पूर्ण किंवा बहुतांश अडथळा असलेले क्षितिज हा घटक असतो.
क्षितिज नसेल तर एखाद्या पृष्ठभागावरील उताराचे आकलन होणे कठीण जाते कारण हे आकलन होण्यासाठी आवश्यक असलेला संदर्भ म्हणजे क्षितिजच नसते. अशावेळी जमिनीला लंब करून उभ्या आहेत असे भासणार्या वस्तू (उदा. झाडे) प्रत्यक्षात वाकलेल्या असतात.
सर्वसामान्यपणे डोंगराळ भागातील रस्त्याचा पट्टा हा तो स्तर असतो जिथे क्षितिज धूसर होते, मग एरवी आपल्याला सरळ उभ्या असलेल्या भिंती किंवा झाडांसारख्या वस्तू किंचित वाकलेल्या दिसतात. यातून द़ृष्टीभ्रम तयार होऊन खाली जाणारा उतार वर जाणारा चढ आहे असे भासू लागते आणि वस्तूही वर जात आहेत असे दिसू लागते. काही वेळा तर नद्याही गुरूत्वाकर्षणाच्या विरुद्ध वाहताना दिसतात.