दक्षिण अमेरिका खंडात आयाळ असलेला लांडगा मोठ्या संख्येने आढळतो. या खंडातील हा सर्वात मोठा श्वानवर्गीय प्राणी आहे. वस्तूत: हा लांडगा नाही व कोल्हाही नाही. क्रायसोसिऑन प्रजातीतील हा एकमेव प्राणी आहे. सुमारे 20 ते 30 किलो वजन असलेल्या प्राण्याची उंची सुमारे 90 सें.मी असते. लांबलचक बारीक पाय व अंगावरील चमकदार केसांमुळे हा प्राणी वैशिष्ट्यपूर्ण दिसतो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मानेजवळ असलेले दाट केस. यामुळे या प्राण्याला आयाळ असलेला लांडगा, असे नाव पडलेले आहे. याच्या मूत्राला मारीजुआना या वनस्पतीसारखा गंध असतो. इतर श्वानवर्गीय प्राण्यांप्रमाणे हा प्राणी झुंडीने राहत नाही. एकटाच शिकार करतो. याच्या भक्ष्यात छोट्या सस्तन प्राण्यांचा व पक्ष्यांचा समावेश असतो. सर्वभक्षी असल्याने वनस्पती व फळांचाही याच्या आहारात समावेश असतो. गवताळ मैदाने व प्रेअरी वनांत याचा निवास असतो.