दोघा एकचि सावली वृक्ष दे जैसा  Pudhari
फीचर्स

Wari 2025। अक्षर वारी भाग ७: दोघा एकचि सावली वृक्ष दे जैसा

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।

पुढारी वृत्तसेवा

पंढरीची वारी हा जसा सामाजिक व धार्मिकद़ृष्ट्या अभूतपूर्व सोहळा वाटतो, तसा नैसर्गिकद़ृष्ट्या तो सृष्टी सतीचा प्रसन्न आविष्कार वाटतो. तसे पाहिले तर ज्ञानोबापासून तुकोबापर्यंतच्या सर्वच संतांनी आपली साधना निसर्गाच्या सान्निध्यात केली व त्यांच्यावर गुरुकृपा आणि ईश्वरी कृपा झाडे, माडे, पशू, पक्षी यांच्या सान्निध्यातच झाली. ज्ञानोबांना गुरुकृपा झालेले स्थळ गहिनीनाथाची गुहा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार होती. जिचे वर्णन करताना खुद्द माऊलीनेच म्हटले होते,

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा

मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।

गहिनी प्रसादे निवृत्ती दातार

ज्ञानदेवा सार चोजविले ।

तुकोबारायांची साधक अवस्था तर भंडारा, भागगिरीच्या साक्षीने वृक्ष, वेली, झाडे, झुडपे यांच्या सान्निध्यातच पूर्णत्वास गेली. मन लोकांच्या कोलाहलात कंटाळते, तेव्हा

वृक्षवल्लीच्या सान्निध्यात ‘स्व’चा शोध घेणे ही केवळ पारमार्थिक माणसाच्याच आत्म्याची भूक नाही, तर सर्वसामान्य माणसाचीसुद्धा ती स्व शोधाची एक आनंदयात्रा वाटते. जोपर्यंत निसर्गाशी संवाद साधण्याची संवेदनशीलता ही एक सुसंस्कारी मनाची गरज आहे, असे वाटत राहील, तोपर्यंत वृक्षवेली केवळ मित्रच नाहीत, तर तेच आपले खरे जीवनलग, सखे-सोयरे होतील. हा भाव प्रकट करताना तुकोबा म्हणतात,

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी

पक्षी ही सुस्वरे आळविती ।

येणे सुखे सुखे रुचे एकातांचा वास

नाही गुण दोष अंगा येतात ॥

आषाढी वारी एकेकाळी केवळ अध्यात्माचा अलौकिक ठेवा प्राप्त करून देणारा पारलौकिक सोहळा वाटत नव्हता, तर आषाढाच्या अभ्राबरोबर क्षणा-क्षणाला रंग बदलणार्‍या सृष्टी सतीचा लोकोत्सव वाटत होता. वारीत सहभागी होणार्‍या प्रत्येक वारकर्‍यांनी आणि अवारकर्‍यांनीसुद्धा वारीचा आध्यात्मिक आचार-विचार तर पार पाळावाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे झाडा-वेलींचे संरक्षण व संवर्धनही करावे. वारीला निघताना घरातून महावृक्षाच्या मुठभर बिया बरोबर घेऊन वारकरी वारीच्या वाटेवर त्या लावत गेला, तर ‘वारी’ स्वर्ग सुखाच्या पलीकडचा अक्षय ठेवा वाटेल. आज हरित वारीच्या माध्यमातून हा प्रयोग केला जातोय. पण, वारकर्‍यांचा त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. वारीच्या नित्य नियमांत वारकर्‍यांनी एखादा अभंग कमी म्हटला तरी चालेल; पण प्रत्येकाने किमान एक झाड लावावे. वारीच्या वाटेवरच्या गावकर्‍यांना त्यांचे संवर्धन करण्यास सांगावे व पुढील वर्षी ते जगले की नाही हे पाहावयास यावे. कारण झाडे ही अजात शत्रू आहेत. याचे वर्णन करताना ज्ञानोबा माऊली म्हणते,

जों खांडावया धाव घाली ।

का लावणी जयाने केली ।

दोघा एकची सावली ।

वृक्ष दें जैसा ॥

- प्रा. शिवाजीराव भुकेले,

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT