पंढरीची वारी ही जशी सर्वांना समान पातळीवर आणणारा समतावादी सोहळा आहे, तसा तो स्त्री-पुरुषांच्या एकतेची वीण विणणारा व दोघांना समान पातळीवर आणणारा सोहळा आहे. आम्ही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात आजही स्त्रियांना प्रत्यक्ष कृतीतून 50 टक्के आरक्षण व शंभर टक्के संरक्षण देऊ शकलो नाही, पण धार्मिक क्षेत्रात मात्र संत चळवळीतील म्होरक्यांनी ‘स्त्री’चा केवळ ‘स्त्री’ म्हणून पारमार्थिक अधिकार नाकारला नाही. एवढेच नव्हे तर वारीच्या वाटेवर भगीनी-भाव आणि मातृभावाचे विराट दर्शन होते.
या वाटेवर स्त्री असो अगर पुरुष असो, लहान असो अगर थोर असो, सर्वांना ‘माऊली’ म्हणूनच ओळखले जाते. आणि माऊली ऽऽऽ माऊलीऽऽऽ नामाचा गजर केला जातो. संतांच्या या पारमार्थिक समतावादामुळे जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा यांच्यासारख्या गावकुसाबाहेर दबलेल्या स्त्रियांच्या वाणीत आत्मसामर्थ्याचे भाव प्रकट झाले आणि त्या संतांना ऑर्डर देताना म्हणू लागल्या,
नामदेव कीर्तन करी
पुढे देव नाचे पांडुरंग
जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग
आषाढी वारी पालखी सोहळ्यात स्वर, सूर, आंतरिक सौंदर्य, शुद्धता, भगिनीभाव, मातृभाव निर्माण करण्याचे काम ‘स्त्री’ वारकरी माऊलींनी केले व आजही करत आहेत. प्रत्येक दिंडीच्या प्रारंभी तुळशी कट्टा डोक्यावर घेऊन आजच्या गलिच्छ वातावरणाला शुद्ध करण्याचे काम या चालत्या-बोलत्या तुळशी करत आहेत. फक्त त्यांच्याकडे ‘पराविया नारी माऊली समान’ या द़ृष्टीने पाहण्याची गरज आहे.
आजही वारीत काही दिंडी सोहळ्याच्या प्रमुख संचालक ‘स्त्रिया’ आहेत. कथा, कीर्तन, भारुडे, गौळणी यांची जरतारी वीण आपल्या सुरेल आवाजाने विणण्याचे काम स्त्री संत करतात. एवढेच नव्हे तर अगदी परधर्मातील ‘जैतुनबी’ सारख्या माऊलीने आपल्या दिंडी सोहळ्याचे नेतृत्वच नाही तर पुणे मुक्कामी ही माऊली ज्ञानोबा माऊलीच्या चरणी लीन झाली. संतांच्या संगतीत वाढता वाढता सोयराबाई सारख्या स्त्री माऊलीच्या वाणीत एवढी तेजस्विता आली की वारीच्या एकत्वाचा रंग व्यक्त करताना ही माऊली म्हणू लागली, अवघा रंग एक जाहला
रंगी रंगला श्रीरंग ।
मी तु पण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया ।
अशा अनेक अभंगांतून संत चळवळीच्या एकत्वाच्या कक्षा रुंदावण्याचे काम वारीच्या वाटेवरील माऊलीने केले. आज आधुनिकतेच्या नावाखाली स्वैराचारी जीवन जगणार्या गावागावांतील अनेक ‘टपोर्या’ मंडळीत वारीतील हा भगिनीभाव लक्षात आला तर माता भगिनींच्या जीवनात काहीसे आशादायक चित्र निर्माण होऊ शकेल.
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)