आनंदाचे आवरू मांडू जगा File Photo
फीचर्स

अक्षर वारी भाग 14: आनंदाचे आवरू मांडू जगा

आषाढी वारी पांडुरंगाच्या सावळ्या रूपाचे आनंदाचे आवार आहे.

पुढारी वृत्तसेवा

आषाढी वारी पांडुरंगाच्या सावळ्या रूपाचे आनंदाचे आवार आहे. वारकरी स्वार्थ निरपेक्ष वृत्तीने, उदात्त हेतूने आणि निर्भेळ आनंदाच्या प्राप्तीसाठी पंढरीची वारी करतो आणि ‘सेवितो हा रस वाटितो आणिका घ्यारे होऊ नका रानभरी’, या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जो आनंद आपल्याला प्राप्त झाला तो आनंद दुसर्‍यांना वाटण्यात वारकर्‍यांना खरी धन्यता वाटते. या आनंदयात्रेमध्ये कुठलीच प्रतिदानाची अपेक्षा नसते.

सार्‍या जगाची तहान भागविणारी नदी प्रतिदानाची कधीच अपेक्षा करीत नाही. एकाच वृक्षाच्या सावलीत चोर, सज्जन, साधू सगळेच विश्रांती घेतात; पण सावली देणारी झाडे कधी भेदभाव करीत नाहीत. तान्हुल्याला स्तनपान करताना आईची कोणतीच अपेक्षा नसते.

सुगंधाचा संदेश वार्‍याच्या एका झुळकीबरोबर आसमंतात पसरविणारे फूल कोणतीच अपेक्षा करीत नाही. तद्धतच वारीतून मिळणारा निखळ आनंद वाटताना वारकरी कुठलीच प्रतिदानाची अपेक्षा करीत नाही, तर उलट हे सारे विश्व आनंदाने बहरून जावे म्हणून ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात तो म्हणत राहतो,

अवघाचि संसार सुखाचा करीन

आनंदे भरीन तिन्ही लोके ।

जाईन गे माये तया पंढरपुरा

भेटेन माहेरा आपुलीया ॥

तसे पाहिले तर व्यक्तीसापेक्ष आनंदाला असुयेचे ग्रहण लागलेले असते. दुसर्‍यांना दुःखी पाहण्यात अनेकांना आनंद वाटतो. तर कधी कधी दुसरा आपल्यापेक्षा आनंदाची एखादी पायरी वर चढला की आपल्या आनंदाचे दुःखात रूपांतर होते. वारीतून भेटणारा आनंद हा असा व्यक्तीसापेक्ष नाही, तर तो विश्वरूप आहे. वारीच्या वाटेवर भक्ती भावनेच्या प्रसन्न पौर्णिमेत, संत वचनांच्या अमृत प्रकाशात आनंदाच्या सागराला भरती येते.

संसारातील दुःख, कष्ट, अमंगलता, व्यथा, तृष्णा यावर विजय मिळवून वारकरी नावाचा साधक आनंदकंद पांडुरंगाच्या सच्चिदानंद रूपाचा आनंद घेण्यासाठी शतकानुशतके वारी करीत आला आहे. वारीत कुठल्याही वारकर्‍याला थांबवून विचारले की, ‘माऊली! का करता आपण वारी? वारीतून आपणास काय मिळते? या प्रश्नांचे वारकर्‍याजवळ एकच उत्तर आहे. ‘आनंद’

आज वैश्विक पातळीवर जो तो जगतो स्वतःसाठी कुणी कुणाचा नाही वाली, अशी विदारक अवस्था झाली आहे. दुसर्‍यासमोर दुःख व्यक्त करायला जावे तर त्याला एक मिनिटही वेळ नाही. अशा निराशाजन्य, दुःख, उसासे, कढ आयुष्याची परवड व्यक्त करण्यासाठी कुठलाच ‘आऊटलेट’ न मिळाल्यामुळे अनेक लोक आत्महत्या करत आहेत. पण वारी मात्र संसारिक क्लेश आणि

दुःखाचा आऊटलेट आहे, एवढे निश्चित. म्हणूनच माऊली म्हणतात,

तैसा वाढविलास विस्तारू ।

गितार्थासी विश्व भरू ।

आनंदाचे आवरू ।

मांडू जगा ॥

- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT