तळेगाव स्टेशन, पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यातील सोमाटणे टोलनाका बेकायदेशीर असुन या टोलनाक्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जलदगती सुनावणी होणार असल्याचे जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी पत्रकारांशी बोलतना नमुद केले. उच्च न्यायालयात सदर टोलनाक्या संदर्भातील जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी तीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्यात आलेली आहे. ही सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय मुंबई येथे होणार आहे.
सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्याने उच्च न्यायालयाच्या मार्फत पाठपुरावा करणार असल्याची माहिती किशोर आवारे यांनी दिली. काही राजकीय मंडळी सोमाटणे टोलनाका बंद होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. तेही जनतेसमोर आणण्यात येईल, असेही आवारे यांनी सांगितले. सदर टोलनाक्याबाबत सुनावणी जलदगतीने होणार असल्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागू शकेल असे मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले.