वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यात पाऊस पडत नसल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आता शेतमाल चोरी होण्याच्या प्रकाराने हतबल झाले आहेत. वाल्हेनजीक सुकलवाडी (ता. पुरंदर) येथे एका शेतकर्याच्या बागेतून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी अंदाजे दीड लाख रुपयांच्या दीड ते पावणे दोन टन डाळिंबांची चोरी केली. या प्रकरणी अस्लम नासिरखान पठाण या शेतकर्याने जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अस्लम पठाण यांची 3 एकर डाळिंबाची बाग आहे. सध्या त्यांनी फळे तोडणीस सुरुवात केली होती. पठाण यांच्या घरी पाहुणे आल्याने दोन दिवस ते बागेकडे फिरकले नव्हते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या बागेतून जवळपास दीड ते पावणे दोन टन डाळिंब चोरून नेले. तसेच मोठ्या प्रमाणात बागेतील डाळिंब तोडून खाली फेकून देत नुकसान केले. यामध्ये पठाण यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस नाईक प्रशांत पवार तपास करीत आहेत.
रात्री जागता पहारा देण्याची शेतकर्यांवर वेळ
सध्या डाळिंबाला प्रतिकिलो 100 ते 140 रुपये असा भाव मिळत आहे. त्यामुळे चोरट्यांनी डाळिंब बागांना लक्ष्य केले आहे. ऐन दुष्काळसदृश परिस्थितीत मोठ्या कष्टाने जपलेल्या बागेतून डाळिंब चोरीला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. रात्री जागता पहारा देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
हेही वाचा :