पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील बेट भागात पालेभाज्या, फळभाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रतिकूल वातावरणात मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाचा काढणी, वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यातून काढणीस आलेल्या फ्लॉवर व कोबी पिकामध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
या परिसरातील शेतकर्यांनी फ्लॉवर, कोबी, धना, मेथी आदी पिके घेतली आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे पिकांवर झालेल्या किडी व रोगांच्या प्रादुर्भावावर महागडी औषधफवारणी केली होती. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने फ्लॉवर, कोबीचे उत्तम पीक घेतले. परंतु, पीक काढणीस आले आणि बाजारभाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. फ्लॉवर, कोबीच्या भावात वाढ न झाल्याने शेतकर्यांना शेतात मेंढ्यांचे कळप, तसेच जनावरे उभ्या पिकात सोडण्याची वेळ आली आहे. या भागातील शेतकर्यांनी रब्बी हंगामात फ्लॉवर, कोबीच्या पिकाची लागवड केली होती. हवामानातील बदल आणि किडी व रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागला. मात्र, हा खर्च वसूल होईल, असा भाव बाजारात मिळत नसल्याने बळीराजामध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोथिंबिरीच्या शेतात सोडल्या शेळ्या-मेंढ्या
कोथिंबीर जुडी अवघी दोन ते चार रुपयाला विकली जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कोथिंबीर काढणे व मार्केटमध्ये विक्रीला घेऊन जाणे परवडत नसल्याने शेतकर्यांनी शेतात मेंढरं सोडून दिली आहेत. सध्या भाजीपाल्याने बाजारभाव कोसळले आहेत. मेथी, शेपू, भेंडी, गवार, कोबी, काकडी, दुधी भोपळा, तोंडली यांचेही बाजार पडले आहेत. कोथिंबीर हे पीक लॉटरीसारखे समजले जाते. चांगले बाजारभाव मिळाले, तर शेतकरी मालामाल होतो. परंतु बाजार पडले तर मजुरीचा खर्चही निघत नाही. सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मातीमोल भावाने कोथिंबीर विक्री करावी लागत आहे तसेच बाजार समितीच्या आवारात विक्री करायला गेल्यावर शंभर जुड्या मागे दहा – वीस जुड्या व्यापारी आडते घेत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. खते, मजुरी व औषधे यांचा खर्च अधिक होत आहे. पिकाला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात गेल्याची खंत पिंपरी पेंढार येथील शेतकरी रामदास जाधव यांनी व्यक्त केली.