टाकवे बुद्रुक, पुढारी वृत्तसेवा: मावळ तालुक्यात भातपीक फुलोर्यात आले असल्यामुळे शेतकरी आनंदात दिसत आहेत. या वर्षी दमदार पाऊस पडल्यामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची बळीराजाला आशा आहे.
या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने भात रोपे तयार होण्यास उशीर झाला होता. त्यामुळे भात लागवड उशिरा झाली होती. तर, विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी देऊन बनवण्यात आलेली भातरोपाची लागवड लवकर झाली होती. पाण्यावरील लागवड झालेले भातपीक फुलोर्यात आले असून, पावसाच्या पाण्यावरती तयार झालेली भातरोपे फुलोर्यात आलेली दिसून येत नाही.
भातपिकाला पोषक असा पाऊस आतापर्यंत पडत असून, यावर्षी भातपिकावर करपा, खोड कीड यासारख्या रोगराईचे प्रमाण कमी दिसत आहे. या वर्षी भातपिकाला पुरेसा पाऊस पडल्याने उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने यावर्षी 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपीक घेण्याचे नियोजन केले आहे. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडव, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, तसेच सहायक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांनी भातपिकाची लागवड केली आहे.