निमोणे, पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याच्या हल्ल्यात चार निष्पाप जिवांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घडीला तालुक्यामध्ये कोणतेही एक गाव असे नाही की तिथे बिबट्यामुळे पशुधनाची हानी झालेली नाही. परिणामी, शेतशिवारातील काम थंडावल्याचे चित्र दिसत आहे.
घोड, भीमा, वेळ व चासकमानच्या पाण्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसपीक घेतले जाते. सुरुवातीच्या काळात या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला, त्या वेळी बहुतांश शेतामध्ये रानडुकरे, ससे यांचा अधिवास असल्यामुळे बिबट्यांना मुबलक खाद्य मिळत होते. मात्र, वन विभागाचे जटिल कायदे बिबट्याच्या वाढीला पोषक ठरले अन् अन्न-पाण्याच्या शोधासाठी बिबट्या मानवी वस्तीमध्ये धुडगूस घालू लागला. शेळ्या-बकरी, पाळीव जनावरे, कोंबड्या, कुत्री हेच बिबट्याचे खाद्य आहे. तो माणसावर हल्ला करीत नाही, या समजुतीमुळे आता आलाच आहे बिबट्या तर घ्या मिळतेजुळते, या विचारांवर श्रध्दा ठेवून जगण्याची वाटचाल सुरूच होती.
दररोजच बिबट्या दिसतोय, आपल्या डोळ्यांसमोर पाळीव प्राणी ओढून नेतोय. करायचे काय? वन विभागाकडे मागणी करायची, त्यांनी असेल पिंजरा तर लावायचा, यापेक्षा जास्त काही होत आहे, असे एकंदरीत दिसत आहे. बरे ज्या भागात पिंजरा लावला जातो, त्या ठिकाणी बिबट्या अगदी पिंजर्याजवळ येतो, कधी कधी पिंजर्यावर चढतो; पण पिंजर्यात जेरबंद होत नाही, हे कशामुळे होते? हा देखील प्रश्नच आहे. एकदा पकडलेला बिबट्या जर पुन्हा जंगलात सोडून दिला जात असेल, तर तो हुशार होणारच ना? या पिंजर्यात गेल्यावर आपण कैद होतो, याची त्याला जर जाणीव होत असेल तर अवघड आहे, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
वन्यजीवांचे कायदे अतिशय किचकट आहेत. सगळ्या परवानग्या थेट नागपूरवरून घ्याव्या लागतात. आज शिरूर तालुक्यात चार माणसे मारली गेली. मात्र, यंत्रणा कागदी घोडे नाचविण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.